३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:10+5:302021-08-13T04:19:10+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर गुरुवारी (दि. १२) घेण्यात आली असून, ...

३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर गुरुवारी (दि. १२) घेण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातून ३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात पाचवीतील १७ हजार ५१२, तर आठवीतील १२,३२८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. कोरोनाच्या सावटात घेण्यात आलेल्या या परीक्षेला प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असले तरी जिल्हाभरातून जवळपास दोन हजार ७४ विद्यार्थी अनुपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील एकूण ३११ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी नाशिक मनपा क्षेत्रातील ५८०९ व मालेगाव मनपा क्षेत्रातील १७८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर उर्वरित जिल्हाभरातून सुमारे २२ हजार ६५१ विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा नियंत्रणासाठी ३११ केंद्र संचालकांसह ३ उपकेंद्र संचालक, १६५३ पर्यवेक्षक व ४७२ शिपाई यांनी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी कामकाज केले. परीक्षेचे कामकाज कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या समन्वयातून फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीसाठी पात्र अथवा अपात्र असा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
इन्फो
..अशी झाली परीक्षा
परीक्षा - केंद्रसंख्या - एकूण विद्यार्थी - उपस्थिती
पाचवी - १७३ - १९,१२५ - १७,५१४
आठवी - १३८ - १३,८२१ - १२,७२८