धार्मिक, सामाजिक विषयांवरील देखावे
By Admin | Updated: September 12, 2016 01:18 IST2016-09-12T01:17:27+5:302016-09-12T01:18:02+5:30
सातपूर गणेशोत्सव : ‘सातपूरचा राजा’चे आकर्षण

धार्मिक, सामाजिक विषयांवरील देखावे
सातपूर : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक, पौराणिक यांसह विविध देखावे सादर केलेले आहेत. देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असून, सातपूर कॉलनीतील ‘सातपूरचा राजा’ने गणेशभक्तांना विशेष आकर्षित केले आहे.
शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचे औचित्य साधत गणेशभक्तांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. यावर्षी गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे सादर केलेले आहेत. सातपूर गावातील अमरज्योत मित्रमंडळाचे हे २३ वे वर्ष आहे. दरवर्षी सामाजिक जिवंत देखावे सादर करणे ही या मंडळाची ख्याती आहे. यावर्षी ‘स्त्रीभ्रूण हत्त्या’ या विषयावर जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे संस्थापक विजय भंदुरे, तसेच चेतन भंदुरे, मच्छिन्द्र भंदुरे, भास्कर मौले, गिरीश गोवर्धने, सुरेश विधाते, किसन शेवकर, गोरक्ष सोनवणे, संजय भंदुरे आदि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सातपूर कॉलनीतील ओमसाईराम मित्रमंडळाने ‘लालबागचा राजा’प्रमाणे सातपूरचा राजा हा भव्य देखावा सादर केला आहे. १५ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती आणि राजवाडा असा देखावा सादर केला आहे. हा भव्यदिव्य देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी तरुण मित्रमंडळाचे हे २२ वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी सावित्री नदीवरील दुर्घटनेवर आधारित ‘दुर्घटना नैसर्गिक की मानवी’ हा सामाजिक देखावा सादर केला आहे. त्याचप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक नरेश सोनवणे यांच्यासह संतोष शेळके, सुनील बोडके, योगेश आहेर, आशिष भदाणे आदि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)