टंचाई प्रस्ताव फेटाळले
By Admin | Updated: June 1, 2017 01:04 IST2017-06-01T01:04:02+5:302017-06-01T01:04:15+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते.

टंचाई प्रस्ताव फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवारचे काम समाधानकारक अर्थात उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्याचे कागदोपत्री दिसून येते. तरीही जलयुक्तचे काम झालेल्या गावांनाच पाणीटंचाईने ग्रासले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच की काय तालुक्यातून आलेले टंचाई प्रस्ताव फेटाळण्याकडे प्रशासनाचा कल आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये प्रस्तावित कामे एकूण ८२६ होती. मात्र प्रत्यक्षात ८२९ कामे पूर्णत्वास आली. सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावित कामे २३२ होती प्रत्यक्षात १५७ पूर्ण झालीत.
तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी एकूण १८ गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भागओहळ, वेळे, गणेशगाव (वा), हिर्डी, मुरंबी, गावठा, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (ह), खरशेत कळमुस्ते (ह), ठाणापाडा, कळमुस्ते (त्र्यं), ब्राह्मणवाडे, मुळेगाव, सामुंडी , देवगाव व टाके देवगाव. सन २०१६-१७ करिता जलयुक्त शिवारकरिता एकूण ९ गावांची निवड करण्यात आली होती. ती गावे अशी-खडकओहळ, शिरसगाव (ह), नांदुरकी पाडा, कडेगव्हाण, चिखलपाडा, गोलदरी, गडदवने, बोरीपाडा व ओझरखेड या गावांमधील २३२ प्रस्तावित कामांपैकी १५७ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ७५ कामे जूनअखेर पूर्ण होतील, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिला.
तेथील विहिरीने तळ गाठला आहे. वयोवृध्द महिला तसेच लहान मुली तर काही पुरु ष मंडळी यांची पाणी आणतांना अक्षरश: दमछाक होत असते. सरकारी नियम आहे की, २ ते ३ कि.मी. परिसरात पाणी असले तर टँकर द्यायचा नाही. असे समीकरण ठरलेले असते.
विहिरींनी तळ गाठला असो., की दूषित पाणी असो.शक्य तो टँकरचा प्रस्ताव नाकारण्याकडे प्रशासनाचा कल असतो. तर मग जलयुक्त शिवारची कामे होऊनही उपयोग होत नसेल तर काय उपयोग, असा सवाल विचारला जात आहे. आणि जलयुक्तचे हेच अपयश झाकण्यासाठी तालुक्यातील असे प्रस्ताव नामंजूर करण्यात येतात. म्हणजेच आमच्या तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे झाल्याने तालुका पाण्याच्या बाबतीत आलबेल आहे, असा संदेश पोहचला पाहिजे.