मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा
By Admin | Updated: July 15, 2016 23:42 IST2016-07-15T23:39:50+5:302016-07-15T23:42:20+5:30
मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा

मालेगावी भाजीपाल्याचा तुटवडा
नाराजी : भाव वाढल्याने नागरिकांचे हालमालेगाव कॅम्प : मालेगावी राज्यासह बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापारी आडत्यांचा अडतीबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याने शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जो माल शिल्लक आहे तो चढ्या दराने घाऊक व किरकोळ बाजारात विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
शासनाने आडत्यांनी अडतमध्ये नवीन नियमावलीचा वापर करावा यासाठी जारी केलेल्या अध्यादेशास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारात दैनंदिन लागणाऱ्या भाजीपाल्यासह इतर वस्तूंचा तुटवडा झाला आहे. व्यापाऱ्यांनी कडकडीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथे काही ठिकाणी भाजीपाला विक्रीस थेट शेतकऱ्यांमार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना देण्यात येत असला तरी या मालाचा तुटवडा भासत आहे. माल कमी व मागणी जादा यामुळे मालाच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. खिशास कात्री लागत आहे. एव्हाना कमी दर असलेली हिरवी मिरची तब्बल २५ रुपये पाव व ८० ते १०० रुपये किलो, बटाटा ४० रुपये किलो, कोथिंबीर १६० रुपये तर १५ रु. जुडी, टमाटे ६० ते ८० रुपये किलो, इतर हिरवा भाजीपाला ६० ते ८० रुपये व १० ते १५ रुपये जुडीप्रमाणे चढ्या दराने विक्री होत आहे.
याबाबत नाशिकमध्ये आडत्यांनी पावणेचार टक्के अडत घ्यावी असा निर्णय झाला आहे. परंतु मालेगावी अद्याप व्यापारी आठ टक्के अडत, एक टक्का मार्केट फी अशा आकारणीवर ठाम आहेत. व्यापारी आडत्यांकडून माल न घेता सरळ शेतकऱ्यांकडून माल घेण्याच्या मनस्थितीत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. आडते व व्यापाऱ्यांच्या तिढ्यांमुळे ग्राहकांची परवड होत आहे. या संपावर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)