सटाण्यात गौणखनिज माफियांना धडकी
By Admin | Updated: March 14, 2017 23:15 IST2017-03-14T22:58:26+5:302017-03-14T23:15:00+5:30
तहसीलदारांची मोहीम : १३ ट्रॅक्टर्सवर कारवाई

सटाण्यात गौणखनिज माफियांना धडकी
सटाणा : बागलाण तालुक्यात प्रशिक्षणार्थी तहसीलदार विनय गौडा यांनी गौणखनिज माफियांच्या मुसक्या आवळल्या. दोन दिवसांत वाळू, मुरूम, दगड आणि मातीची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या तब्बल १३ ट्रॅक्टर्सवर कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
तहसीलदारांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन कॉप्यांचा पाऊस पडत असलेल्या नामपूर आणि लखमापूर परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांचा अहवाल मंडळाला पाठविल्याने इतर केंद्रप्रमुखांनी चांगलाच धसका घेतला आहे. बागलाण तालुक्यात नव्यानेच आयएएस अधिकारी असलेले विनय गौडा तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री तहसीलदार गौडा यांनी मोसम खोऱ्यात वाळूसह अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या माफियांच्या विरोधात धडक कारवाई केली. एकाच रात्री नामपूर, द्याने व ताहाराबाद येथून सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. द्याने येथील सतीश कापडणीस,नामपूर येथील भालचंद्र पवार, नाना भामरे, सुभाष पाटील व ताहाराबाद येथील वाळूचा एक ट्रॅक्टर , श्रावण पवार यांच्या मालकीचा दगड वाहतूक करणारा ट्रॅक्टर असे सहा ट्रॅक्टरर्स जप्त केल्याने मोसम पट्ट्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. तहसीलदार गौडा यांनी अनधिकृत वीटभट्ट्याही टार्गेट केल्या असून, ठेंगोडा येथील विविध अनधिकृत वीटभट्ट्यांवर छापे टाकून तब्बल सात ट्रॅक्टरर्स जप्त केले आहेत. अलियाबाद व ठेंगोडा येथील दोन ट्रॅक्टरर्स नियमानुसार दंड आकारणी करून सोडण्यात आले आहेत. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार नामपूर औट पोस्ट येथे सहा, तर सटाणा तहसील आवारात सात असे १३ ट्रॅक्टर्स जप्त आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दंड भरल्याशिवाय कोणत्याही वाहन सोडणार नसल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. बागलाणमधील सर्वच खडी क्रेशर्सला तहसीलदार गौडा यांनी सील ठोकत नियमानुसार रॉयल्टी भरली नसल्याचा ठपका ठेवला आहे.