प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 20, 2015 00:08 IST2015-03-19T22:51:57+5:302015-03-20T00:08:49+5:30
प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल
येवला : नांदगाव तहसीलदारांसह मनमाड मंडलाधिकारी यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जिवे मारण्याच्या प्रयत्नांनंतर वाळूमाफियांची मजल थेट प्रांताधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेली आहे.
प्रांताधिकारी वासंती माळी यांना शहरातील वाळूमाफियांनी जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. येवला शहर पोलीस ठाण्यात या घटनेवरून रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली.
माळी या शासकीय वाहनाने भारम येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याचा कार्यक्र म आटोपून येवल्याला परत येत असताना त्यांना कोटमगाव
शिव रस्त्यावरून नंबरप्लेट नसलेला वाळूचा डंपर दिसला. त्यांनी
तो डंपर थांबवून वाहतुकीचा
परवाना व रॉयल्टीच्या कागदपत्रांची मागणी चालकाकडे केली
असता त्याने मालकाला बोलावून घेतले. त्यानंतर डंपर मालक
किशोर परदेशी व बंटी परदेशी हे तेथे आले.
त्यांनी प्रांताधिकारी यांना धमकी देऊन शिवीगाळ करण्यास
सुरु वात केली. किशोर परदेशी यांनी चालकाला तू गाडी घेऊन निघ मी पाहतो अशी असभ्य भाषा वापरत प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीचालकाला धक्काबुक्की केली. डंपरमधील सुमारे सहा ब्रास अवैधरीत्या वाहतूक केलेली वाळू रस्त्यावर टाकून चालक फरार झाला.
वाहनचालक ज्ञानेश्वर रामचंद्र डंबाळे, रा. हुडको कॉलनी यांच्या फिर्यादीवरून वाळूचे अवैध उत्खनन, सरकार कामात अडथळा आणणे तसेच सरकारी व्यक्तीस जिवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा भादंवि ३९२, ३७९, ३४१, १८८, ५०४, ५०६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८ प्रमाणे व गौणखनीज कायदा कलम ४ प्रमाणे किशोर परदेशी, बंटी परदेशी व डंपरचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)