...म्हणे कुंभमेळ्यात शिरेल बिबट्या
By Admin | Updated: March 22, 2015 23:44 IST2015-03-22T23:43:34+5:302015-03-22T23:44:03+5:30
वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकाचा अजब निष्कर्ष

...म्हणे कुंभमेळ्यात शिरेल बिबट्या
नाशिक : चांदवड येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप होत असताना आपले कर्मचारी हेच कसे योग्य आहेत याचा डंका पिटणाऱ्या मुख्य वनसंरक्षकांनी आता अजबच विधान केले आहे. कुत्र्याच्या वासाने म्हणे बिबटे शहरात येऊ शकतात, त्यामुळे कुंभमेळ्याच्या परिसरात कुत्रे फिरकणार नाहीत याची दक्षता घ्यावी असा सल्लाही त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पालिका मुखंडांना देऊन टाकला.
कुंभमेळ्यात उघड्यावर अन्नपदार्थ टाकले गेल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी येतील. त्यामुळे कुत्र्यांना भक्ष्य बनविण्यासाठी कदाचित बिबट्यादेखील कुंभमेळ्यात ‘दर्शन’ देण्याची शक्यता महाशयांनी वर्तविली. कुत्रा हा प्राणी अत्यंत सहजपणे बिबट्याला उपलब्ध होतो. बिबट्याला बघताच कुत्र्यांची पाचावर धारण बसते व बिबट्या कुत्र्याला भक्ष्य बनवितो, असा त्यांचा दावा आहे. खरे तर अवघे शहर कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने आणि उपद्रवाने त्रस्त झाले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचे करायचे काय असा प्रश्न महापालिकेलाही पडला आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र वन अधिकाऱ्यांनी कोणत्या आकडेवारीच्या आधारे असा निष्कर्ष काढला हे मात्र समजण्यापलीकडचे आहे. तसे असेल तर शहरातील कुत्र्यांची संख्या पाहता बिबट्यांचा वावर शहरातच असायला हवा. दररोज कुठेना कुठे बिबट्याने कुत्र्याला भक्ष्य केल्याच्या घटना घडायला हव्यात, मात्र अशी कोणतीही घटना किंवा सर्वेक्षण नसताना मुख्य वनसंरक्षकांनी कोणत्या आधारे हे विधान केले हे त्यांनाच ठाऊक !
त्यांच्या या विधानामुळे आणि कुत्र्यांच्या संख्येमुळे बिबट्या शहरातच वावरत नसेल कशावरून, अशी भीती नाशिककरांच्या मनात निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)