सावंत पिछाडीवर, कोकणी स्पर्धेत विधान परिषद : अल्पसंख्याकांना प्राधान्य?
By Admin | Updated: June 3, 2014 02:20 IST2014-06-02T22:03:34+5:302014-06-03T02:20:07+5:30
नाशिक : राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदासाठी अशोक सावंत यांच्या नावाला पक्षांतर्गत होत असलेला विरोध व त्यातून मराठा समाजालाच हे पद देण्यावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता एका मराठ्याला सदस्य करून दुसर्याची नाराजी ओढवून घेण्याऐवजी मराठेतर समाजाची वर्णी लावण्याच्या पर्यायावर पक्षात गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, त्यातून जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांचे नाव पुढे आले आहे.

सावंत पिछाडीवर, कोकणी स्पर्धेत विधान परिषद : अल्पसंख्याकांना प्राधान्य?
नाशिक : राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदासाठी अशोक सावंत यांच्या नावाला पक्षांतर्गत होत असलेला विरोध व त्यातून मराठा समाजालाच हे पद देण्यावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता एका मराठ्याला सदस्य करून दुसर्याची नाराजी ओढवून घेण्याऐवजी मराठेतर समाजाची वर्णी लावण्याच्या पर्यायावर पक्षात गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, त्यातून जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांचे नाव पुढे आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला आपलेसे करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू केले असून, त्यातूनच राज्य मंत्रिमंडळात जितेंद्र आव्हाड यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची बाब पुढे आली असून, पक्षाने आजवर उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लीम समाजाच्या एकाही व्यक्तीला संधी दिलेली नाही. त्यामुळे परवेज कोकणी यांचे नाव पुढे आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात अशोक सावंत यांचे नाव पक्षाने सुचविल्याची चर्चा सुरू होताच, त्याच्या तीव्र प्रतिक्रिया पक्षात उमटल्या होत्या. भुजबळ विरोधकांनी सावंत यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, तर सावंत यांच्याऐवजी श्रीराम शेटे, सुनील बागुल यांची वर्णी लावावी यासाठी गट सक्रिय झाले होते. दोन्ही गटांनी पालकमंत्री भुजबळ यांची भेट घेतली असता, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते; परंतु या पदावर कुणा एकाची वर्णी लावली तर दुसरा गट नाराज होईल अशी भीती व्यक्त केली जात असून, अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा-मराठेतर असा प्रचार झाल्याने त्याचा फटका भुजबळ यांना बसला होता. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती नको म्हणून कोणालाही नाराज न करता, अल्पसंख्याक समाजाला हे पद देऊन त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा पर्याय पुढे आला आहे. कोकणी हे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री भुजबळ या दोघांच्या गटाचे असल्याने त्यांच्या नावावर एकमत होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)