नाशिक : चार महिन्यांपूर्वी महापालिकेने महत्प्रयासाने अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविला, परंतु त्यासाठी महापालिकेला तब्बल ८२ लाख ८९ हजार रुपये मोजावे लागले आहेत. आता पालिकेने सदर खर्च वसूल करण्यासाठी पावले उचलली असून, ज्या भंगार बाजार व्यावसायिकांकडून त्यांच्या जागेवर बांधकाम परवानगीचे अर्ज सादर केले जातील तेव्हा ४३ रुपये प्रति चौ. मीटर दराने खर्च वसूल करण्याचे आदेश नगररचना विभागाला अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.उच्च न्यायालयात अंबड-लिंकरोडवरील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी जनहित याचिका दाखल झालेली होती. या जनहित याचिकेनुसार ५२३ अनधिकृत शेड दर्शविण्यात आले होते. नंतर महापालिकेने सर्व्हे केला त्यावेळी त्यात नव्याने २४० अनधिकृत लोखंडी शेड आढळून आल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने एकूण ७६३ अनधिकृत भंगार बाजाराचे शेड हटविण्यासाठी दि. ७ ते १० जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली होती. त्यामध्ये महापालिकेचे मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्या चार दिवसांच्या वेतनाचा खर्च १२ लाख ३५ हजार १६ रुपये दर्शविण्यात आला. तसेच पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्तासाठी १७ पोलीस निरीक्षक, ५८ उपनिरीक्षक, ४४० पोलीस कर्मचारी, ६४ शिपाई व ३३ ट्रॅकिंग फोर्स तैनात करण्यात आला होता. त्यासाठी २३ लाख ६७ हजार १३२ रुपये खर्च आला. याशिवाय, महापालिकेने १२ पोकलॅन, ३० जेसीबी, ४८ डंपर व २६ ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. त्यासाठी महापालिकेला १५ लाख ४८ हजार १६० रुपये खर्च आला. याशिवाय, वाहनांसाठी इंधन पुरविणे, नगररचनामार्फत सर्वेक्षण करणे, विधी विभागामार्फत वकिलांचा सल्ला घेऊन कागदपत्रे तयार करणे, संपूर्ण मोहिमेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण, छायाचित्रण यांसह अन्य बाबींवर ३१ लाख ४३ हजार ८० रुपये खर्च आला आहे. त्यानुसार, महापालिकेला सदर भंगार बाजार हटविण्यासाठी ८२ लाख ८९ हजार ३८८ रुपये खर्च आला आहे. आता हा सारा खर्च संबंधित भंगार बाजार व्यावसायिकांकडून वसूल केला जाणार असून, त्यासाठी महापालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
भंगार बाजार हटविण्यासाठी पालिकेला ८३ लाखांचा खर्च
By admin | Updated: April 30, 2017 02:09 IST