शनिवारी आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:23 IST2016-06-30T23:33:53+5:302016-07-01T00:23:33+5:30
येवला नगरपालिका : इच्छुकांचे लक्ष; निवडणुकीच्या तयारीला येणार वेग

शनिवारी आरक्षण सोडत
येवला : नगरपालिकेच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २) सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी वासंती माळी, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे. आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी स्तरावर हरकती व सुनावणीनंतर विभागीय आयुक्त यांच्यामार्फत १० आॅगस्टला प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
शासनाच्या नव्या धोरणानुसार येवला शहरात १२ प्रभाग निश्चित झाले आहेत. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत येवला पालिकेत १२ महिला व १२ पुरुष नगरसेवक म्हणून सन २०१६-२०२१ या कालावधीत सभागृहात दिसणार आहे. येवला पालिकेत सर्वसाधारण गटासाठी १५ जागांसाठी आठ पुरु ष व सात महिला, अनुसूचित जातीसाठी निश्चित केलेल्या दोन जागांमधून एक पुरु ष व एक महिला, अनुसूचित जमातीसाठी राखीव एकमेव जागेसाठी महिला आरक्षण आहे, तर इतर मागासवर्गीय गटातील सहा जागांसाठी तीन पुरु ष व तीन महिलांसाठी आरक्षण असणार आहे. या आरक्षण सोडतीकडे भावी नगरसेवकांचे लक्ष लागले असून, आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी व तयारीला वेग येणार आहे. (वार्ताहर)