सातपूरकरांचे पाेस्ट कार्यालयाचे स्वप्न होणार ३५ वर्षांनंतर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:14+5:302021-06-09T04:18:14+5:30
सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा ...

सातपूरकरांचे पाेस्ट कार्यालयाचे स्वप्न होणार ३५ वर्षांनंतर पूर्ण
सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा घेतली होती. या जागेवर पोस्ट कार्यालय उभारण्यात यावे म्हणून गेल्या २५ वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने मागील पंचवार्षिक काळात नगरसेवक सलीम शेख यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पोस्ट कार्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती. त्यानुसार खासदार गोडसे यांनी जागेची पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
प्रस्तावित भूखंडावर पोस्ट कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी म्हाडा आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागाकडून ना हरकत दाखला अवश्यक होता. मात्र या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. खासदार गोडसे यांनी स्वतः प्रयत्न करुन म्हाडा व महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिल्याने पोस्ट कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सरकारकडून इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. सदर बांधकामाची वर्कआउट ऑर्डर निघाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातपूर विभागात डाक विभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली. इन्फो== सातपूर येथे सुसज्ज असे पोस्ट कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे. या कार्यालयात नागरिकांना पोस्टाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच आधुनिक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या स्वतंत्र कार्यालयात साधारण १५ ते २० अधिकारी, कर्मचारी यांची संख्या असणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण पसरले आहे.