सातपूर औद्योगिक वसाहतीत चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: June 27, 2017 20:30 IST2017-06-27T20:30:05+5:302017-06-27T20:30:05+5:30
आठवड्यात तीन चोरीच्या घटना : औद्योगिक वसाहतीतील चोऱ्यांच्या संख्येत वाढ; बंदोबस्ताची मागणी

सातपूर औद्योगिक वसाहतीत चोरट्यांचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच आठवड्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत़ रविवारी पुन्हा औद्योगिक वसाहतीतील धुमाळ इंडस्ट्रीज कंपनीच्या अकौंट कार्यालयाची काच फोडून चोरट्यांनी पावणे तीन लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास सातपूर पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे़
पंचवटीतील महालक्ष्मीनगर येथील रहिवासी तुषार दिनेश जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत धुमाळ इंडस्ट्रीज कंपनी आहे़ रविवारी (दि़२५) रात्री आठ ते सोमवारी (दि़२६) सकाळी नऊ वाजेदरम्यान चोरट्यांनी कंपनीच्या वरच्या मजल्यावरील अकौंट कार्यालयाची काच फोडून कंपनीत प्रवेश केला़ तसेच या कार्यालयातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील २ लाख ७५ हजार रु पयांची रोकड चोरून नेली.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील चोरट्यांची भीड चेपली गेली असून, कंपनीच्या सुरक्षारक्षकांवर दगडफेक करण्यापर्यंत मजल गेली आहे़ याप्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--इन्फो--
आठवड्यातील तिसरी घटना
औद्योगिक वसाहतीतील कंपनीत चोरी होण्याची ही तिसरी घटना आहे़ गोविंदसन प्लाझा लाइट इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीतील शौचालयाची खिडकी तोडून चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून २३ हजार १८१ रुपये किमतीची ४८ किलो वजनाची झिंक आणि कॉपर वायर चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) घडली़ तसेच सुरक्षारक्षक रुद्रप्रताप सिंग तसेच त्यांच्या सहकारी सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून पलायन केले़ यानंतर दुसरी चोरीची घटना डेराडेकस पॉवर स्विचेस या कंपनीत घडली होती़ चोरट्यांनी या कंपनीतील बायोमेट्रिक मशीन तोडून नुकसान केले़ तसेच कंपनीतील सोलर मेटल व रोख रक्कम असा ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़