सातपूरची घटना : तीन महिन्यांनंतर ‘त्या’ जळीत मृतदेहाची पटली ओळख
By Admin | Updated: March 17, 2017 01:22 IST2017-03-17T01:22:31+5:302017-03-17T01:22:48+5:30
प्रियकरानेच विवाहितेची हत्त्या केल्याचे उघड

सातपूरची घटना : तीन महिन्यांनंतर ‘त्या’ जळीत मृतदेहाची पटली ओळख
नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वासाळी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या एका अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह ज्योती पवार नामक विवाहितेचा असून, तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वासाळी शिवारातील एका डोंगराच्या निर्जन परिसरात १९ डिसेंबर रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. सदर मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तविला होता. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी चर्चा करून तपासाला गती दिली. सदर महिलेच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना पंचनाम्यात निदर्शनास आले; मात्र संशयिताने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलेचा चेहरा ओळखू येत नव्हता. यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील हरविलेल्या महिलांची यादी तपासली. सर्वत्र या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत प्रयत्न केले; मात्र चेहरा जळालेला असल्यामुळे मयत महिलेची ओळख पटत नव्हती. सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये राहणारी ज्योती ऊर्फ अश्विनी पवार नावाची महिला मागील दोन महिन्यांपासून परिसरात दिसून येत नसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे धिवरे, झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरविली. बेपत्ता झालेल्या ज्योतीच्या आईकडे चौकशी केली असता, पोलिसांना तिचे मनीष नावाच्या एका इसमाशी आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती हाती आली. पोलिसांनी तत्काळ मनीषचा सुगावा घेत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. (प्रतिनिधी)पैशांच्या मागणीवरून खूनज्योतीकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. अनेकदा पैसे देऊनदेखील ती पैशासाठी दबाव टाकत होती. यामुळे तिला १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पैशाचे आमिष दाखवून वासाळी शिवारातील डोंगराजवळ नेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली मनीष याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनीष याने चाकूने वार करून डोक्यावर दगड मारून खून केला व पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून देत पळ काढल्याचे सिंगल यांनी यावेळी स्पष्ट केले.