सातपूर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार
By Admin | Updated: March 2, 2016 23:58 IST2016-03-02T23:57:56+5:302016-03-02T23:58:16+5:30
सातपूर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार

सातपूर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार
नाशिक : सातपूर येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याच्या मार्गाला परिवहन मंत्र्यांनी मान्यता दिली असून, त्यानुसार आता लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार नितीन भोसले यांनी दिली.
या कामासाठी आपल्या आमदार निधीतून यापूर्वीच १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ३ डिसेंबर २०१४ रोजी त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आणि काम सुरू करण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. परंतु बसस्थानकाची जागा ९९ वर्षांच्या कराराने औद्योगिक विकास महामंडळाकडून घेण्यात आली होती. त्यातच या इमारतीचे विकास शुल्क भरण्यात आले नव्हते आणि पूर्णत्वाचा दाखला नव्हता. यासंदर्भातील पूर्तता करण्यास ठेकेदाराला सूचित करण्यात आले होते. मात्र, त्याने नकार दिल्याने हा विषय रखडला होता. आता या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नव्याने प्रक्रिया राबविण्याची आपली मागणी परिवहन मंत्र्यांनी मान्य केल्याने रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून आता नव्याने प्रक्रिया राबवून काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.