वैविध्यपूर्ण फराळाच्या सादरीकरणाने सखी झाल्या तृप्त
By Admin | Updated: October 22, 2016 23:50 IST2016-10-22T23:50:08+5:302016-10-22T23:50:38+5:30
बक्षिसांची लयलूट : शेफ विष्णू मनोहर यांनी दिला पारंपरिक पदार्थांना आधुनिक साज

वैविध्यपूर्ण फराळाच्या सादरीकरणाने सखी झाल्या तृप्त
नाशिक : तयार होत असलेले चटकदार पदार्थ, सोबतीला विनोदी शैलीत सुरू असलेले शेफ विष्णू मनोहर यांचे खुमासदार निवेदन, गृहिणींच्या शंकांचे तितक्याच तत्परतेने निरसन, गोड-तिखट गटात घेतलेल्या स्पर्धेतून बक्षिसांची लयलूट, भाग्यवंत सखींना प्राप्त झालेल्या सोन्याच्या अंगठ्या ही सारी ट्रिपल धमाका मेजवानी सखींनी अनुभवली. निमित्त होते लोकमत सखी मंच आणि फॉरच्युन विव्हो डायबेटिस केअर आॅइल प्रस्तुत ‘दिवाळी फराळ कार्यशाळे’चे. ऐश्वर्या मंगल कार्यालय, मालेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सखींनी दिवाळी फराळाची अनोखी सफर अनुभवली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, सखी मंचच्या कार्यक्रमाला आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटते. या मंचच्या माध्यमातूनच माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. महिलांची स्वयंपाककलेतील रुची आणि ऊर्जा पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर मनोहर यांनी मोझेरोला स्टिक्स, पनीर जिलेबी, गव्हाचा चिवडा, आलू भुजिया, कांदा चकली, चॉकलेट करंजी असे दिवाळीचे पारंपरिक पदार्थ मात्र त्यांना आधुनिक ट्विस्ट देत तयार करून दाखविले. दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी कुकरी शो करताना घडणाऱ्या गमतीजमती, दैनंदिन स्वयंपाक सुलभ व्हावा म्हणून छोट्या-छोट्या टिप्स, पाककलेचे महत्त्व अशा अनेक विषयांवर त्यांनी सादरीकरणादरम्यान मार्गदर्शनही केले.
दिवाळी फराळ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित प्रशांत हिरे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण शेगावकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रशांत हिरे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट, राम बंधू, बाफणा ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.
दिवाळी फराळ स्पर्धेतील विजेत्या सखींना फॉर्च्युन विव्हो आॅइलतर्फे गिफ्ट हॅँपर देण्यात आले. या स्पर्धेसाठी पारस सेल्स डिस्ट्रिब्युटरचे हेमंत मोदी, फॉर्च्युन आॅईलचे ए.एस.ई. दिरेंद्र प्रसाद, रामबंधू मसाल्याचे विपणन
प्रमुख भानुदास गुंडकर तसेच
अशोक बैरागी, मंगला बैरागी, सतीश कलंत्री, जयघोष जाधव,
उर्मिला जाधव यांच्यासह सखी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)