सटाणा : सहा घरे भस्मसातआदिवासी वस्तीला आग
By Admin | Updated: May 17, 2015 23:39 IST2015-05-17T23:36:32+5:302015-05-17T23:39:37+5:30
सटाणा : सहा घरे भस्मसातआदिवासी वस्तीला आग

सटाणा : सहा घरे भस्मसातआदिवासी वस्तीला आग
सटाणा : तालुक्यातील अचानकनगरच्या अग्नितांडवाला पंधरा दिवस उलटत नाही तोच चौगावबर्डी शिवारातील आदिवासी वस्तीला भीषण आग लागून सहा झोपड्या भस्मसात झाल्याची घटना रविवारी (दि. १७) घडली. लागलेल्या भीषण आगीत जीवितहानी झाली नसली, तरी सर्व घरांमधील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
सटाणा शहरापासून चार किमी अंतरावर चौगाव बर्डी ही आदिवासी वस्ती असून, या वस्तीपासून काही अंतरावर सहा आदिवासी बांधवांची झोपडीवजा घरे होती. सर्व कुटुंबे ही मोलमजुरीसाठी परिसरातील शेतात गेलेली असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका झोपडीला अचानक आग लागली. परिसरातील सर्वच झोपड्या पाचटाची असल्याने आगीने क्षणात रौद्ररूप धारण करत सहाच्या सहा झोपड्यांना आपल्या कवेत घेतले. आजूबाजूच्या नागरिकांना आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र पाणी उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना आग विझविण्यात यश आले नाही. सटाणा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले; परंतु तोपर्यंत सर्व आदिवासीच्या संसारांची राखरांगोळी झाली होती. घटनास्थळी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी भेट देऊन मंडळ अधिकाऱ्यांसमवेत पंचनामा केला आहे. पंचनाम्यातील माहितीनुसार आगीत अर्जुन पवार, नारायण पवार, पोपट पवार, सखाराम पवार, साहेबराव पिंपळसे यांचे प्रत्येकी एक लाख
रुपयांचे, तर इलाबाई पवार यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)