सटाणा ते नाशिक बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:44+5:302021-05-30T04:12:44+5:30
लोहोणेर : लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने सटाणा ते नाशिकसाठी बसेसद्वारे प्रवास करण्याची प्रवाशांना सुविधा उपलब्ध ...

सटाणा ते नाशिक बससेवा सुरू
लोहोणेर : लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने सटाणा ते नाशिकसाठी बसेसद्वारे प्रवास करण्याची प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती सटाणा आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळच्या सटाणा आगारातून नाशिक मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवासी उपलब्धतेनुसार बसेस सुरू करण्यात येणार आहेत. सटाणा आगारामार्फत नाशिकला जाणेसाठी सटाणा येथून सकाळी ८ वाजता, दुपारी २ वाजता व सायंकाळी साडेपाच वाजता तर नाशिकहून सकाळी ८ वाजता, दुपारी ११ वाजून १५ मिनिटांनी व सायंकाळी साडेपाच वाजता ह्या वेळेवर सदर बसेस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी उपलब्ध झाल्यास टप्प्या-टप्प्याने बसेस सोडण्यात येणार असल्याचे बिरारी यांनी सांगितले.
-----------------
बसेसचे निर्जंतुकीकरण
बसेस पुरविताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार बसेस संपूर्णतः निर्जंतुकीकरण करून या मार्गावर देण्यात येणार असून, प्रवाशांनी सार्वजनिक एसटीच्या वाहतुकीचा वापर करताना शासन निर्देशाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. सदर प्रवासादरम्यान तोंडाला मास्क बांधणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे प्रवाशांना आवश्यक असणार आहे. एका आसनावर केवळ एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो व आसनव्यवस्थेत झिकझंग (नागमोडी) पद्धतीचा वापर केला जाणार आहे. शासन निर्देशानुसार एकावेळी बसमधून केवळ २२ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असल्याने प्रवाशांनी सदर प्रवास मार्गावर वाहकांस सहकार्य करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांनी केलेले आहे.