सटाणा पालिकेला दोन कोटींचे पॅकेज
By Admin | Updated: September 7, 2016 01:08 IST2016-09-07T01:08:04+5:302016-09-07T01:08:26+5:30
भाजपा, राष्ट्रवादीत श्रेयवाद : निवडणुकीच्या तोंडावर अनुदान

सटाणा पालिकेला दोन कोटींचे पॅकेज
सटाणा : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी विशेष रस्ता अनुदान म्हणून शहरासाठी दोन कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. या निधी मंजुरीवरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सटाणा पालिकेला शहरांतर्गत रस्ता व शाळा, महाविद्यालयाजवळ रस्ता क्र ॉसिंगसाठी भुयारी मार्ग काढण्यासाठी दोन कोटी रु पयांचे पॅकेज मंजूर केले आहे. हे पॅकेज पालिका निवडणुकीच्या तोंडावर मंजूर केल्यामुळे साहजिकच श्रेयवाद निर्माण झाला आहे. पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पक्षाचे बागलाणमधील माजी आमदार संजय चव्हाण यांचे शासन दरबारी वजन असल्यामुळे त्यांनी रस्ता अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरू केला होता. त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे सत्ताधारी नगरसेवकांचे म्हणणे आहे. असे असताना दुसरीकडे मात्र भाजपाचे पदाधिकारी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी आपल्या लेटर हेडवरच या कामाची मंजुरी यादी माहितीसाठी वितरित केली जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सध्या श्रेय घेण्यावरून एक प्रकारे स्पर्धाच सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते काका रौंदळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहर विकासाच्या दृष्टीने संजय चव्हाण, आमदार दीपिका चव्हाण यांचा प्रयत्न सुरू आहे.
रस्ता अनुशेष भरून काढण्याबरोबरच भुयारी मार्गासाठी पालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. आमदार चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे निधी मिळवता आला. या कामामुळे शहर विकासात भर पडणार आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे यांनी याचे श्रेय पक्षालाच जात असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांनी सुचविलेल्या कामांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्याचा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष जाधव यांनी पाठपुरावा करून मंजुरी मिळवून आणल्याचे सांगून त्याचे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगितले. (वार्ताहर)