सटाणा आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद
By Admin | Updated: September 12, 2016 00:25 IST2016-09-12T00:16:19+5:302016-09-12T00:25:59+5:30
सटाणा आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद

सटाणा आगाराची मुक्कामी एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद
पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण-विसापूर मार्गावरील वळण रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच ठिकाणी भगदाड पडल्याने भादवणला येणारी सटाणा आगाराची मुक्कामी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद झाली आहे. यामुळे भादवण येथील शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व तालुक्याच्या ठिकाणी जाणारे ग्रामस्थ, शेतकरी, गावात येणारे नातलग यांची मोठी गैरसोय झाली असून, संबंधित विभागाकडून रस्ता अद्यापही सुरळीत केला जात नसल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे .
यंदाच्या जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहून निघाल्याने व परिसरात दोनदा झालेल्या मुसळधार पावसाने भादवण-विसापूर रस्त्याला वळणाच्या ठिकाणी चार ते पाच जागेवर अत्यंत खोल भगदाड पडल्याने या रस्त्यावरून चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस सुरळीत राहिला नसून भगदाड असलेल्या वळणावर ट्रॅक्टर, एस.टी. टेम्पो, ट्रक अशा लांब वाहनांचे मागील चाक भगदाडाच्या ठिकाणी जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावात मुक्कामी येणारी बस दोन महिन्यापासून बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी पाच कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. रस्त्याला पडलेले भगदाड संबंधित विभागाकडून बुजविण्यात न आल्यामुळे भादवण येथील गावकऱ्यांची गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
भादवण-विसापूर रस्त्याला शेती असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीत घेऊन जाण्यासाठी हा रस्ता आता वापरता येत नसल्याने फेरा मारून जावे लागत आहे. संबंधित विभागाने याबाबतीत लक्ष न घातल्याने सदर रस्ता अपघातग्रस्त झाला आहे .
संबंधित विभागाने भगदाड बुजवून रस्ता सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंकज जाधव, नीलेश जाधव, मोहन जाधव, गौतम जाधव, प्रवीण जाधव, काकाजी जाधव, राहुल जाधव, अनिल जाधव, प्रमोद जाधव, सुधाकर जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)