सटाणा बाजार समिती बनली कचराकुंडी
By Admin | Updated: January 11, 2016 22:27 IST2016-01-11T22:24:39+5:302016-01-11T22:27:32+5:30
घाणीचे आगार : आरोग्य धोक्यात, प्रशासनाकडून पणनच्या आदेशाला केराची टोपली

सटाणा बाजार समिती बनली कचराकुंडी
नितीन बोरसे ल्ल सटाणा
ठिकाण सटाणा बाजार समिती
सडलेल्या कांद्याचे ढीग, फेकलेले डाळींब, साचलेले पाणी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून शेतकऱ्यांबरोबर सर्वांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र येथील बाजार समिती आवारात बघायला मिळाले. या अस्वच्छतेमुळे बाजार समिती प्रशासनाने एकप्रकारे पणन मंत्रालयाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ बाजार समित्यांमध्येही राबविण्याचे आदेश पणन मंत्रालयाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला, अन्नधान्याची आवक होत असते. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होऊन आवार पूर्णपणे अस्वच्छ होतो. प्रसंगी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या कमी करण्यासाठी विविध बाजार घटकांतील सदस्यांची समिती स्थापन करून या समितीने दर सोमवारी बैठक घ्यावी तसेच सहायक निबंधकांनी शुक्रवारी भेट द्यावी आणि त्रूटी आढळल्यास सूचना कराव्यात, असे पणन मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
मात्र सटाणा बाजार समिती आवारात रविवारी दुपारी १ वाजता फेरफटका मारला असता, सहायक निबंधक तथा प्रशासक कार्यालय आवारालाच कचरा डेपोचे स्वरूप आल्याचे चित्र बघायला मिळाले.
सहायक निबंधक कार्यालयाजवळ डाळिंबाचे लिलाव होतात. लिलाव झाल्यानंतर डाळींब खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांकडून त्याच ठिकाणी मालाची प्रतवारी केली जाते. चांगला माल खोक्यात टाकला जातो आणि खराब, सडलेले डाळींब त्याच ठिकाणी आजूबाजूला अस्ताव्यस्त फेकले जातात.
डाळींब बाजारासमोरच कांद्याचे लिलाव केले जातात. त्याठिकाणी कांदा पॅकिंग शेडही तयार करण्यात आले आहेत; परंतु संबंधितांकडून खराब कांद्याची इतरत्र विल्हेवाट न लावता आवारातच फेकले जातात. या प्रकारामुळे बाजार समिती आवाराला अक्षरश: कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आवारात सांडपाणी साचले आहे. या अस्वच्छ परिसरामुळे दुर्गंधी पसरून बळीराजाबरोबर सर्वच घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.