सरपंच आढावा बैठकीत कोरोनाची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:17+5:302021-07-16T04:12:17+5:30
येवला : पंचायत समिती प्रशासनाने पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंचांची आढावा बैठक घेण्यात आली; मात्र या बैठकीत कोरोना नियमांना ...

सरपंच आढावा बैठकीत कोरोनाची ऐशीतैशी
येवला : पंचायत समिती प्रशासनाने पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सरपंचांची आढावा बैठक घेण्यात आली; मात्र या बैठकीत कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आल्याचे दिसून आले. ७० आसनक्षमता असलेल्या सभागृहात १५० पेक्षा अधिक लोकांना बोलावण्यात आले होते, तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना या बैठकीचे निमंत्रण नसल्याने निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी सभागृह सोडले.
ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत विविध प्रकारच्या तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त झाल्याने सर्व जिल्ह्यांतील तालुका पातळीवर दर तीन महिन्यांनी सरपंचांची आढावा बैठका घेण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समितीने सरपंचांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, तसेच जनतेच्या कामांना विलंब होऊ नये यासाठी ही बैठक बोलावली होती. व्यासपीठावर गटविकास अधिकारी डॉ. उन्मेश देशमुख, सभापती प्रवीण गायकवाड, उपसभापती मंगेश भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना का आमंत्रित करण्यात आले नाही, तसेच कोरोनाबाबतच्या शासकीय नियमांचे पालन का करण्यात आले नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीला कोरोना झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी बैठकीत केली. यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बैठकीला बोलावण्याचे आदेश नसल्याचे गटविकास अधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावर सरपंच व प्रशासनाचा दुवा म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य काम करीत आहेत. सरपंच दरवेळी पंचायत समितीत येऊ शकत नसल्याने सदस्य कामाचा पाठपुरावा करतात. त्यामुळे सदस्यांना बैठकीला न बोलावल्याच्या, तसेच कोरोनाबाबत शासकीय नियमांचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे गटनेते मोहन शेलार यांनी सभात्याग केला.
दरम्यान, उपस्थित सरपंच यांच्या अडीअडचणी प्रशासनाच्या वतीने समजून घेण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांची कामे वेळेत करण्याच्या सूचना सभापती गायकवाड, उपसभापती भगत, गटविकास अधिकारी डॉ. देशमुख यांनी ग्रामसेवकांना दिल्या. बैठकीस तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- १५ सरपंच मीटिंग
येवला येथील पंचायत समिती सभागृहात बैठकीला झालेली सरपंचांची गर्दी.
150721\15nsk_30_15072021_13.jpg
फोटो- १५ सरपंच मिटींगयेवला येथील पंचायत समिती सभागृहात बैठकीला झालेली सरपंचांची गर्दी.