जायखेडा : बागलाण तालुक्यातील मेंढीपाडे (जयपूर) येथील गावठाणच्या जागेवर सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी सुरु असलेल्या विहिरीच्या खोदकामास विरोध करीत येथील सरपंच चंद्रसिंग सूर्यवंशी व भांडण सोडवण्यास गेलेल्या आदिवासी तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस ठाण्यासमोर तीन ते चार तास ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मेंढीपाडे-एकलहरे-वाडीपिसोळ या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाढीव विहीर खोदण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र विहीर खोदताना आम्हाला का विचारले नाही, अशी कुरापत काढून संदीप सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी व सुनील सूर्यवंशी या तिघांनी विहिरीच्या कामास विरोध करीत सरपंच चंद्रसिंग सूर्यवंशी यांना मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या आदिवासी तरु णासही मारहाण करण्यात आली. या दोघांना मार लागल्याने मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दिवसभर टाळाटाळ केल्याने, मेंढीपाडे-एकलहरे-वाडीपिसोळ येथील सतंप्त ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात सोमवारी (दि. २७) रात्री नऊ ते आकरा वाजेपर्यंत ठिय्या देत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. अखेर जखमी चंद्रसिंग सूर्यवंशी यांचे वडील धनसिंग सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीशी एका पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावी केली. (वार्ताहर)
मेंढीपाडे येथे सरपंचास मारहाण
By admin | Updated: March 29, 2017 00:18 IST