सरपंच, उपसरपंचपदासाठी इच्छुकांची जोरदार ‘लॉबिंग’
By Admin | Updated: August 4, 2015 23:08 IST2015-08-04T23:07:35+5:302015-08-04T23:08:06+5:30
नांदूर परिसर : १५ पैकी १० ग्रामपंचायतींत येणार महिलाराज

सरपंच, उपसरपंचपदासाठी इच्छुकांची जोरदार ‘लॉबिंग’
नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर कमी होतान्होतो तोच नांदूरशिंगोटे परिसरातील तब्बल १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तप्त झाले आहे. परिसरातील गावांमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी इच्छुकांनी जोरदार ‘लॉबिंग’ सुरू केली आहे. अनेक ठिकाणीचे ग्रामपंचायत सदस्य सहलीला रवाना झाले आहेत.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी सिंहस्थाचे कारण देत प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका घेतल्या होत्या. गेल्या वर्षापासून सिन्नर तालुक्यात लोकसभा, विधानसभा, माळेगाव पंचायत समिती पोटनिवडणूक, जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ, विविध विकास संस्था, पतसंस्था, पगारदार संस्था, ग्रामपंचायत व नुकत्याच झालेल्या बाजार समिती व खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकांमुळे तालुकाभर राजकीय घमासान सुरू होते. विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वच निवडणुकांत चुरस पहायला मिळाली. राजकीय पक्षांपेक्षा आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावानेच सर्व निवडणुका लढल्या गेल्या. अनेक ठिकाणी आरक्षणामुळे ग्रामपंचायत स्तरावर बहुमत येऊनही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. परिसरातील प्रामुख्याने चास, दोडी बुद्रुक, गोंदे, दातली, दापूर, मानोरी, कणकोरी, कासारवाडी, दोडी खुर्द, सुरेगाव, पिंपळे, धुळवाड, चापडगाव, मऱ्हळ खुर्द, नळवाडी, निऱ्हाळे आदि गावांत राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे. सर्वसाधारण आरक्षण असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी आर्थिक घडामोडींना सुरुवात झाली आहे. काठावरच्या गावांमधील इच्छुकांनी सदस्यांना सहलीला रवाना केले आहे. आरक्षणामुळे हिरमोड झालेल्या सदस्यांनी उपसरपंचपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (वार्ताहर)