मनातल्या गाण्यांची ‘सरीवर सर’!

By Admin | Updated: November 9, 2015 00:37 IST2015-11-09T00:35:52+5:302015-11-09T00:37:08+5:30

सलील-संदीप यांची मैफल रंगली

'Sarirav sar' of my mind! | मनातल्या गाण्यांची ‘सरीवर सर’!

मनातल्या गाण्यांची ‘सरीवर सर’!

नाशिक : कधी ‘त्यांच्या’ मनातल्या, तर कधी रसिकांच्या मनातल्या गीतांची ‘सरीवर सर’ बरसत राहते... फर्माइशींचा सिलसिला सुरूच राहतो अन् या स्वरांच्या सरींत रसिक चिंब होत राहतात... दीपोत्सवाच्या या चैतन्यमय दिवसांत रसिकांच्या मनाचे कोपरेही या मैफलीमुळे मग उजळून निघतात...
असाच काहीसा प्रत्यय ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या ‘मनातली गाणी’ मैफलीत आला. खास दिवाळीनिमित्त हा स्वरोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. कुलकर्णी यांनी ‘जननी जिवलगे येई तो पांडुरंगे’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘सूरमयी श्याम इस तरह आए...’ ही गझल त्यांनी पेश केली. यावेळी याच अर्थाच्या आरती प्रभूंच्या ‘आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी’ या कवितेची आठवणही त्यांनी जागवली. पुढे ‘आयुष्यावर बोलू काही’मधली ‘सरीवर सर’सह अन्य बालगीते, प्रेमगीते सादर करीत कुलकर्णी-खरे जोडीने रसिकांची दाद घेतली. गायिका रागिणी कामतीकर यांनीही ‘केव्हा तरी पहाटे’, ‘ऐरणीच्या देवा’ ‘लख-लख चंदेरी’ ही गाणी गायली. ‘दिवा लागू दे रे देवा’ या गीताने मैफलीचा समारोप झाला. आदित्य आठल्ये (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज, ढोलकी), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड) यांनी संगीतसाथ केली. रसिकांच्या फर्माइशींमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची होती.
ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या ३६ विद्यार्थिनींना आकाशकंदील देऊन कार्यक्रमाला आगळ्या पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sarirav sar' of my mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.