पंचवटीत सराईत गुन्हेगाराची हत्या
By Admin | Updated: April 28, 2017 00:34 IST2017-04-28T00:34:43+5:302017-04-28T00:34:43+5:30
दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी येथील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची गजानन चौकात हत्त्या

पंचवटीत सराईत गुन्हेगाराची हत्या
पंचवटी : दिंडोरीरोडवरील अवधूतवाडी येथील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्ची (२८) याची गजानन चौकात हत्त्या करण्यात आल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अज्ञात टोळक्याने अजित खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयाबाहेर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी रुग्णालय परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
रात्री उशिरा ११.३० वाजेच्या सुमारास अजित हा येथील पानटपरीवर आला असता पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले.
सदर हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अजित याला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करून पोलिसांनी २९ भ्रमणध्वनी जप्त केले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अजितची हत्त्या आपसातील वैमनस्यामुळे झाली असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मार्केट यार्ड परिसरात एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा हत्त्येची घटना घडल्याने पंचवटीत परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)