सप्तसुरांनी घडला राष्ट्रभक्तीचा संगम
By Admin | Updated: August 12, 2016 23:06 IST2016-08-12T23:05:34+5:302016-08-12T23:06:12+5:30
वंदे मातरम : शास्त्रीय गायनाला दाद

सप्तसुरांनी घडला राष्ट्रभक्तीचा संगम
नाशिक : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या ‘वंदे मातरम’ गीताच्या सर्व कडव्यांचे वेगवेगळ्या विविध रागांमधील सादरीकरणाने नाशिककरांनी देशभक्तीची आनंदानुभूती देणारी सप्तसुरांची संगीतसंध्या अनुभवली.
धीरगंभीर, भीमपलाश आणि लयदार शुद्ध सारंग अशा मिश्र स्वरूपाच्या रागांमधून सादरीकरण केलेल्या वंदे मातरम गीताने सप्तसुरांमध्ये राष्ट्रभक्तिरसाचा संगम घडवून आणला.
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित या कार्यक्र मात बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम गीताला विविध रागांमध्ये सादर करण्यात आले. तत्पूर्वी अभिनंदन थोरात, डॉ. सत्येन जोशी, अर्जुन टिळे, शिवाजी गांगुर्डे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, पल्लवी धर्माधिकारी आदिंनी दीपप्रज्वलन केले. या संगीत मैफलीत गायक ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे आणि रागिणी कामतीकर यांनी वेगवेगळ्या रागात पाचही कडवे सादर केले. यातील दोन चाली नव्याने लावण्यात आल्या होत्या. त्यांना ओंकार अपस्तंभ, सतीश पेंडसे (तबला), सुभाष दसककर (हार्मोनियम), अनिल धुमाळ (की बोर्ड), मोहन उपासनी (बासरी), अनिल दैठणकर (व्हायोलीन), उमेश खैरनार (आॅक्टोपॅड) यांची साथसंगत लाभली. निवेदक स्वानंद बेदरकर यांनी वंदे मातरम गीतातील शब्दांचा सुरांशी संगम साधला. त्यानंतर सुरू झालेला कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरु मित बग्गा, नगरसेवक शाहू खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)