सप्तशृंगगड : प्रकल्पाच्या उद्घाटनावरून भाजपा-शिवसेनेत रंगला कलगीतुरा फ्यूनिक्युलर ट्रॉली लवकरच सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:24 IST2018-01-25T23:40:29+5:302018-01-26T00:24:25+5:30
कळवण : आदिशक्ती श्री सप्तशृंगमातेचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.

सप्तशृंगगड : प्रकल्पाच्या उद्घाटनावरून भाजपा-शिवसेनेत रंगला कलगीतुरा फ्यूनिक्युलर ट्रॉली लवकरच सेवेत
कळवण : आदिशक्ती श्री सप्तशृंगमातेचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून, परदेशी अभियंत्यांकडून चाचणीदेखील झाली आहे. शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर फ्यूनिक्युलर ट्रॉलीमधून सप्तशृंगीमातेचे अवघ्या तीन मिनिटात दर्शन घेता येणार आहे. त्याची आस भक्तांना लागली असून, फ्यूनिक्युलर ट्रॉली लवकर कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकल्पाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजपा - शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे.
गडावरील ११० कोटी रुपयांचा फ्यूनिक्युलर ट्रॉली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या आघाडी काळातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व तत्कालीन आमदार स्व. ए.टी. पवार यांच्या प्रयत्नांतून प्रकल्प पूर्णत्वास येत आहे हे नाकारून चालणार नाही. मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनावरून राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिवसेना या राज्यातील दोन्ही पक्षांकडून कुरघोडी सुरू झाली असून, उद्घाटनापूर्वीच उद्घाटन सोहळ्यावरून भाजपा - शिवसेनेत लढाई सुरू झाली आहे. गडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्यासाठी नागपूर येथून मागील महिन्यापासून हालचाली गतिमान झाल्या असल्याने भाजपा-स्तरावरून उद्घाटन सोहळ्याची लगीनघाई चालू होती. काम पूर्ण झाले नसताना काम पूर्ण झाल्याचा अहवाल संबंधित विभागाकडून प्राप्त करण्यासाठी मागील महिन्यात भाजपास्तरावरून प्रयत्न केले गेले. मात्र काम पूर्णत्वाबाबत संबंधित विभागाने नकारघंटा दिल्याने फडणवीस यांच्या हस्ते होणारे उद्घाटन लांबणीवर पडले. आता उद्घाटन सोहळा कार्यक्रमावरून भाजपा व शिवसेना यांच्यात जुंपली असून, काम कोण करते आणि श्रेय कोण लाटतंय म्हणण्याची वेळ आली असताना आमदार जे.पी.गावित यांच्या मतदारसंघातील हा प्रकल्प असल्याने आमदार गावित या प्रश्नी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी फ्यूनिक्युलर ट्राली प्रकल्पाची पाहणी करून लवकरच प्रकल्प कार्यान्वित होईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच होईल याची चाहूल त्यांच्या दौºयानंतर लागली होती. मात्र तांत्रिक कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे पूर्ण नसल्याचे कारण दिल्याने उद्घाटन लांबले. शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी या प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेला विश्वासात घ्या नाहीतर कार्यक्र म उधळून लावू व आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
८० रुपये तिकीटदर
जुलै २०११मध्ये प्रकल्प पूर्णत्वानंतर ४० रुपये प्रतिव्यक्ती दर आकारला जाणार होता. दरवर्षी यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार होती. प्रकल्प सुरू होण्यास २०१८ उजाडले आहे. त्यामुळे वाढीव किमतीसह ८० रुपये दर आकारला जाईल. ३ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना तसेच अंध, अपंग, दिव्यांगांना ४० रु पये दर असेल. ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी तिकीटदरात निम्मी सवलत देण्यात येणार आहे. हा दर येण्या-जाण्याचा असेल. तीन वर्षांच्या आतील बालकांसाठी शुल्क आकारले जाणार नाही. प्रकल्पाच्या वाढलेल्या कामामुळे खर्च व काम होण्यास वेळ लागला. करारानुसार ९८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॉली सुरू करता येते. शासनाकडून अंतिम ना हरकत दाखला मिळाल्यानंतर उद्घाटन सोहळा निश्चित केला जाईल. शक्य तेवढ्या लवकर प्रकल्प सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती फ्यूनिक्युलर ट्रालीचे व्यवस्थापक राजीव लुंबा यांनी दिली.