संत कबीरनगर बसथांबा असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 22:48 IST2015-11-23T22:47:04+5:302015-11-23T22:48:14+5:30
द्वारका : दारूड्यांचा प्रवाशांना होतो उपद्रव

संत कबीरनगर बसथांबा असुरक्षित
नाशिक : जळगाव, औरंगाबादकडे जाणाऱ्या बससेसला द्वारकाजवळील संत कबीरनगर येथे देण्यात आलेला बसथांबा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. आजूबाजूचा झोपडपट्टी परिसर, कचऱ्याचे ढीग आणि मद्यपींच्या त्रासामुळे रात्री आणि दिवसाही या ठिकाणी प्रवाशांना उभे राहाणे मुश्किल झाले आहे.
एस.टी. महामंडळाच्या ग्रामीण भागाकडे, तसेच आग्रारोडने जाणाऱ्या सर्व बसेसना त्याचप्रमाणे पुण्याकडे जाणाऱ्या बसेसलाही द्वारका येथील संत कबीरनगर येथे बसथांबा निर्माण करण्यात आला आहे. पालिकेने या ठिकाणी उभारलेला थांबा अत्यंत चुकीचा आणि प्रवाशांसाठी गैरसोयीचा असाच आहे.
कुटुंबीयांसह या ठिकाणी बसेसची वाट पाहणाऱ्यांना येथील टवाळखोर, तसेच मद्यपी झोपडपट्टीधारकांचा त्रास अनेकदा होतो. या ठिकाणी पसरलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना नीट उभे राहण्यासाठीदेखील पुरेशी जागा नाही. पावसात तर प्रवाशांना आजूबाजूचे हॉटेल्स, तसेच दुकानांचा आसरा घ्यावा लागतो. मात्र तेथेही प्रवासी सुरक्षित नसल्याचा अनुभव प्रवाशांना आला आहे. (प्रतिनिधी)