भीती अन‌् अंधश्रद्धेपोटी सर्पांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:35+5:302021-08-13T04:17:35+5:30

नाशिक : वेगाने सरपटत जाणारा लांबलचक साप दिसताच अनेकांची पाचावर धारण बसते. प्रत्येक सर्प हा विषारीच असतो असे नाही. ...

'Sankrant' on snakes out of fear and superstition | भीती अन‌् अंधश्रद्धेपोटी सर्पांवर ‘संक्रांत’

भीती अन‌् अंधश्रद्धेपोटी सर्पांवर ‘संक्रांत’

नाशिक : वेगाने सरपटत जाणारा लांबलचक साप दिसताच अनेकांची पाचावर धारण बसते. प्रत्येक सर्प हा विषारीच असतो असे नाही. मात्र, सर्पाविषयीची भीती आणि अंधश्रद्धेपोटी सर्पांवर मृत्यू ओढावतो. सर्प हा माणसाचा शत्रू कमी अन‌् मित्रच अधिक आहे. धान्य उत्पादनाला उंदरांपासून संरक्षण देण्याचे प्रमुख कार्य सर्पांकडून पार पाडले जाते, म्हणूनच सापांना शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हटले जाते. नागरी वस्तीजवळ तसेच शेतांमध्ये प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे चार विषारी साप आढळून येतात.

अन्नसाखळीत सर्पांचे स्थान महत्त्वाचे आहे. जनसामान्यांमध्ये सापांविषयीचे अनेक गैरसमजुती अंधश्रद्धा पसरलेल्या असल्यामुळे आणि सर्पांविषयीच्या अज्ञानातून सर्प-मनुष्य संघर्ष निर्माण होताना पाहावयास मिळतो. शहरी व ग्रामीण भागात बहुतांश सर्पमित्र हे सर्पांना ‘रेस्क्यू’ करण्यासाठी धडपडत असतात. मात्र, यापैकी काही सर्पमित्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सोशल मीडियावर विविध प्रकारचे सर्पांसोबतचे स्टंट करतानाचे छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करतात अन‌् वादाच्या भोवऱ्यात सापडतात.

--इन्फो--

साप अशी करतो आपली गुजराण...

साप हा सस्तन प्राणी असून तो पूर्णत: मांसाहारी आहे. यामुळे साप दूध पितो आणि डूक धरतो वगैरे गैरसमजुती या अंधश्रद्धा अन‌् अज्ञानातून पुढे आल्या आहेत. प्रत्येक सर्प हा आपले भक्ष्य पूर्णपणे गिळंकृत करतो. उंदीर, पाली, घुशी, सरडे, बेडूक आणि मासे हे सापाचे प्रमुख खाद्य आहे. तसेच बहुतांश सर्प हे झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यांमधील अंडीही खातात. काही सर्प उदा. नाग, मण्यारसारखे विषारी सर्प अन्य विषारी, बिनविषारी सर्पांनाही आपले खाद्य बनवितात.

--इन्फो--

मानवी वस्तीत साप आढळल्यास...

सापापासून सुरक्षित अंतरावर थांबावे त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.

पाळीव प्राणी, लहान मुलांना सापाजवळ जाऊ देऊ नये.

सापाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, गोंगाट करू नये.

तत्काळ वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर अथवा नोंदणीकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

इमारतीच्या आजूबाजूला मोकळ्या जागेतील गवताळ भागात साप वावरत असेल तर त्यास डिवचू नये किंवा मारू नये.

--इन्फो-

तंत्र-मंत्रांनी सर्पाचे विष उतरत नाहीच!

सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी टोल-फ्री १०८ क्रमांक फिरवावा.

सर्पदंश झालेला शरीराचा अवयव हृदयाच्या खालच्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

विषारी किंवा निमविषारी सर्पदंश असेल तर त्याचे विष हे कुठल्याही मांत्रिकाच्या तंत्र-मंत्रांनी उतरू शकत नाही, हे लक्षात घ्यावे.

विषारी सर्पदंशावर केवळ प्रतिसर्प विष (एएसव्ही) हेच एकमेव औषध असून ग्रामीण तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात ते उपलब्ध असते.

--इन्फो--

सापांबद्दलचे काही वैशिष्ट्य...

सापांना अंत:कर्ण असतात. सापांना आवाजाचे ज्ञान जमिनीतील कंपनांनी होते.

सापाचे गंधज्ञान उल्लेखनीय असते. सापाची जीभ लांब व टाेकाजवळ दुभागलेली असते.

भक्ष्याच्या शोधात साप आपली जीभ सतत आतबाहेर करत असतो.

साप एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दोन वेगवेगळी दृश्ये बघतो. हलणारे भक्ष्य किंवा वस्तू त्याचे लक्ष वेधून घेते.

पावसाळ्याच्या प्रारंभी सापाची पिले जन्माला येतात. काही सर्पांच्या जातीमध्ये मादी अंडी घालते.

Web Title: 'Sankrant' on snakes out of fear and superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.