सांज ये गोकुळी सावळी सावळी...
By Admin | Updated: December 21, 2015 23:07 IST2015-12-21T23:03:16+5:302015-12-21T23:07:58+5:30
‘आकाशगाणी’ : भावगीतांना चढला साज

सांज ये गोकुळी सावळी सावळी...
नाशिक : लाविते मी निरांजन, जगी ज्यास कोणी नाही, सांज ये गोकुळी, जिथे सागरा धरणी मिळते... या आणि अशा आशयघन मराठी गीतांचा आस्वाद संगीतप्रेमींना लुटण्याची संधी शनिवारी (दि.१९) मिळाली. निमित्त होते स्वरप्रभा संगीत संस्था आयोजित ‘आकाशगाणी’ या कार्यक्रमाचे. त्र्यंबकरोड येथील स्त्री मंडळ सभागृहात आकाशगाणी या कार्यक्रमात जुन्या मराठी भावगीतांचे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात मंजिरी सबनीस यांनी गायलेल्या गजमुख ने गणपती ये निनघे वंदने नंबी दवर पालीना कल्पतरू नी ने या कन्नड भाषेतील गणपती स्तवनाने झाली. स्वरप्रभा संगीत संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवंदना संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुकुंद कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पं. प्रभाकर पंत दसककर, पं. विजय हिंगणे, तबलावादक नितीन पवार, प्रदीप लवाटे, गजल गायक संजय बानुबाकोडे आदि उपस्थित होते. स्वरप्रभाच्या संचालिका निला देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना गाणे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. मंजिरी सबनीस यांच्यासह आसावरी पाटणकर, वैशाली मनवळ, शैला वाणी, अलका मोकाशी, अवंती वाड, श्रेया गुप्ते, हर्षा वैद्य, सुनेत्रा महाजन मांडवगणे, शुभदा केळकर, सरिता देशमुख, कविता जोगळेकर, वैशाली अग्निहोत्री, सुजाता सातभाई, निशांत नाईक यांनी गीतांचे सादरीकरण केले, तर विलास पाटणकर आणि अमित भालेराव (तबला), भास भामरे (ढोलकी), नेहा सराफ (हार्माेनिअम), प्रसाद भालेराव आदिंनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी, तर विलास पाटणकर यांनी आभार मानले. यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.