संदीप फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्याचा खून ‘ट्रॅडिशनल डे’
By Admin | Updated: February 17, 2015 00:59 IST2015-02-17T00:57:14+5:302015-02-17T00:59:38+5:30
सेलिब्रेशनला गालबोट : एका संशयितास अटक

संदीप फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्याचा खून ‘ट्रॅडिशनल डे’
नाशिक : ट्रॅडिशनल डेचे सेलिब्रेशन सुरू असताना विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविणाऱ्या संशयितांनी रवींद्र नाना बोरसे (२४, कार्तिकनगर, कामटवाडा, सिडको) या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी दुपारी त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये घडली़ महाविद्यालय आवारात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ मयत वोरसे याच्या नातेवाइकांनी संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेऊन जिल्हा रुग्नालयात पोलीस व महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केले. एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती कळवणचे उपविभागीय पोलीस उपधीक्षक सचिन गुंजाळ यांनी बोरसेच्या नातेवाइकांना दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते़ त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये सध्या विविध डेज सुरू आहेत़ सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन गटांतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या़ यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी संशियत किरण जाधव (रा. आनंदवल्ली) आणि दिव्येश आवारे (रा. गंगापूर रोड) हे दोघे महाविद्यालय आवारात तलवार व धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. ज्या ठिकाणी मिरवणूक सुरू होती तिथे हे दोघे तलवार फिरवून विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवित होते, तर विद्यार्थीही सैरावैरा पळत होते. या दोघांनी रवींद्रला घेरून त्याच्यावर वार केल्याचे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.