शनिवारी सामूहिक नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:55 IST2017-08-28T00:55:28+5:302017-08-28T00:55:33+5:30
‘ईद-उल-अज्हा’अर्थात बकरी ईद येत्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने दहा वाजता ईदगाहवर सामूहिकरीत्या नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे.

शनिवारी सामूहिक नमाजपठण
नाशिक : ‘ईद-उल-अज्हा’अर्थात बकरी ईद येत्या शनिवारी साजरी केली जाणार आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने दहा वाजता ईदगाहवर सामूहिकरीत्या नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना जिलहिज्जा सुरू झाला असून या बकरी ईद या महिन्याच्या दहा तारखेला साजरी करण्याची प्रथा आहे. यानुसार येत्या शनिवारी मुस्लीम बांधव हा सण साजरा करणार आहे. दरम्यान, ईदचे सामूहिक नमाजपठण ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर खतीब यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न होणार आहे. या महिन्यात मुस्लीम बांधवांकडून हज यात्रा पूर्ण केली जाते. यावर्षी तीस तारखेपासून हज यात्रेला प्रारंभ होणार आहे. ईदच्या दिवशी हजचा मुख्य विधी पूर्ण होणार असून पुढे चार दिवस यात्रा सुरू राहणार आहे. प्रत्येक यात्रेक रू सुमारे चाळीस दिवस हज यात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये मुक्कामी असतो.
बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील सुन्नी मरकजी सिरत समितीच्या वतीने खतीब यांनी सर्व कायदे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कुर्बानी करताना कुठल्याही कायद्याचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन शुक्रवारी विशेष नमाजपठणादरम्यान, सर्व धर्मगुरूंनी केले. बकरी ईदच्या नमाजपठणाची तयारी करण्यात येत असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता सर्वच मशिदींमध्येही नमाजपठणाची व्यवस्था राहणार आहे.