देहविक्रीसाठी अल्पवयीन मुलींची विक्री
By Admin | Updated: May 24, 2016 23:07 IST2016-05-24T22:44:12+5:302016-05-24T23:07:10+5:30
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश : महिला एजंटसह चौघे ताब्यात

देहविक्रीसाठी अल्पवयीन मुलींची विक्री
पंचवटी : नाशिक शहरातील अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघा संशयिताना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये मल्हारखाण येथील महिला एजंटसह राजस्थानच्या तिघांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून कार ताब्यात घेतली असून संशयितांनी नाशिकच्या पाच मुलींची बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, कर्नाटक राज्यात विक्री केल्याची माहिती उजेडात आली आहे.
पीडित मुलीच्या आईशी शिर्डीतील सुनीता गौराणे हल्ली राहणार मल्हारखाण हिने पाच वर्षांपूर्वी ओळख वाढवून तुमच्या मुलीसाठी स्थळ आहे, तिचा विवाह करायचा का असे सांगून पत्ता विचारून लुणकरण चोथमजी परमार या एजंटसह घर गाठले त्यानंतर मुलगा मुंबईला कामाला आहे असे सांगून दुसऱ्या दिवशी नाशिकरोड येथून त्या अल्पवयीन मुलीला रेल्वेने अहमदाबादला नेले. तेथे राजस्थानला राहणाऱ्या नितीन जैन (संघवी) याला दाखवून एका कार्यालयात विवाह लावून दिला व त्यानंतर संशयित गौराणे व परमार यांनी जैनकडून सुमारे पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर जैनने तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनीता गौराणे, छगनलाल जोधराज जैन, लुनकरण परमार यांना ताब्यात घेतले आहे.