आवास योजनेच्या ५७ हजार अर्जांची विक्री
By Admin | Updated: March 23, 2017 23:51 IST2017-03-23T23:51:32+5:302017-03-23T23:51:50+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेमार्फत तीन घटकांकरिता आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झाली.

आवास योजनेच्या ५७ हजार अर्जांची विक्री
नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेमार्फत तीन घटकांकरिता आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झाली असून, २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या सहाही विभागांत योजना क्रमांक २ ते ४ साठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार, आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झालेली आहे. गेल्या २० मार्चपासून महापालिकेने अर्ज स्वीकृती सुरू केली आहे. त्यानुसार दोन दिवसांत महापालिकेकडे १२९ अर्ज दाखल झाले आहेत. सदर अर्ज २० एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असून, त्यानंतर त्यांची वर्गवारी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अंतिम यादी केंद्र सरकारकडे पाठविली जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेने झोपडीधारकांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे सुरू केला आहे. त्यानुसार, नाशिक पश्चिम विभागातील ३८६८ झोपड्यांमधील ५२७२ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात घरांचे नंबर, मोजमापासह आवश्यक माहिती संकलित करण्यात आली आहे.
बुधवार (दि.२२) पासून सातपूर विभागातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बुधवारी कांबळेवाडी येथील ४६४, धम्मचौक १३५, वडारवाडी १०० तर उत्कर्षनगरातील ७९ झोपड्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)