कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मनपासमोर धरणे
By Admin | Updated: November 13, 2014 00:12 IST2014-11-13T00:11:45+5:302014-11-13T00:12:03+5:30
कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मनपासमोर धरणे

कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मनपासमोर धरणे
नाशिक : गेल्या महिनाभरापासून जुने नाशिक भागात साथीच्या आजारांसह डेंग्यूने थैमान घातले असून, अद्याप तीन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून, मनपाच्या आरोग्य विभागाकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व जुन्या नाशकात स्वच्छता मोहिमेचा फार्स टाळावा या मागणीसाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
जुन्या नाशकातील डेंग्यूने मृत्यू झालेल्या बालकांना न्याय मिळावा व महापालिका प्रशासनाने परिसरातील घंटागाडी व्यवस्था सुरळीत करावी आणि व्यापक प्रमाणात जनजागृती अभियान राबवून सकाळ-संध्याकाळ डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार व स्वच्छता निरीक्षकांसह मुकादमांकडून कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घातले जात असून, परस्परांमध्ये आर्थिक ‘हित’ जोपासले जात असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. (प्रतिनिधी)