नवरात्रोत्सवासाठी सजली बाजारपेठ
By Admin | Updated: October 3, 2015 23:55 IST2015-10-03T23:53:27+5:302015-10-03T23:55:18+5:30
तयारी सुरू : देवीचे दागिने, पूजा साहित्य खरेदीसाठी दाखल

नवरात्रोत्सवासाठी सजली बाजारपेठ
नाशिक : गणेशोत्सवानंतर सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मंगळवार (दि.१३) पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी शहरातील बाजारपेठ सजली असून, विविध पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली आहे.
शहरातील कुंभारवाडा परिसरात मातीचे घट बनविण्याची विशेष लगबग सुरू आहे. तयार झालेल्या घटांवर रंगांचा आणि विविध रेखाचित्र काढण्यासाठी अखेरचा हात फिरवला जात आहे. गुजराथी परंपरेत मातीच्या घटांमध्ये आकर्षक दिवे लावण्याची प्रथा असल्याने यासाठी विशेष मातीच्या घटांची निर्मिती करण्यात येत आहे.
नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या मुख्य देवतांची, तसेच त्यांची स्वरूपे असलेल्या नवदुर्गा, अपराजिता या कुलदेवींचीही पूजा केली जाते. मातीच्या घटांबरोबरच प्रतीकात्मक देवीच्या मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करण्यात येते. या प्रतीकात्मक मूर्तीसाठी नाक, डोळे, नथ, गळ्यातील विविध हार विक्रीसाठी दाखल झाले आहेत. नवरात्रात देवीच्या शृंगाराला विशेष महत्त्व असते. देवीच्या या शृंगारासाठी वेणी, कुंकू, कानातले अलंकार, मंगळसूत्र, मुखवटा, पैंजण, जोडवे, देवीचे मुकुट, घागरा, ओढणी, साडी, खण अशा शृंगार खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत विशेष गर्दी दिसून येते.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी पूजा साहित्य आणि हवन सामग्रीचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. सुगंधित उदबत्ती, धूप, लांब वाती, श्रीफळ, देवीसाठी ओटी आदि साहित्यही बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)