संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थानं
By Admin | Updated: June 10, 2017 00:43 IST2017-06-10T00:43:10+5:302017-06-10T00:43:21+5:30
त्र्यंबकेश्वर : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी आज, शुक्रवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात रवाना झाली.

संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थानं
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी आज, शुक्रवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात रवाना झाली. तत्पूर्वी कीर्तनादी सोहळा संपन्न झाले. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा हा अभंग झाला आणि चांदीच्या रथात महाराजांच्या पादुका विराजमान होत दिमाखदार पालखी रथ सोहळ्याला प्रारंभ झाला.
देवस्थानचे मानकरी जयंत महाराज गोसावी, सुरेश महाराज गोसावी, मनोहर (मनू) महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, निवृत्ती महाराज डावरे, देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे, दिंडी व्यवस्थापक पुंडलिकराव थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, पवन भुतडा, रामभाऊ मुळाणे, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, डॉ. धनश्री हरदास, अविनाश गोसावी, योगेश गोसावी आदींसह महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज जाधव (ओझरखेडकर) आदींसह देवस्थान व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, विष्णू बदादे व दादा आचारी आदी उपस्थित होते.
निवृत्तिनाथ मंदिरापासून रथ श्रीकुशावर्त तीर्थापर्यत आला. यावेळी कुशावर्त तीर्थावर नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्या हस्ते निवृत्तिनाथांच्या पादुकांची पूजा करण्यात येऊन पूजास्थानापासून ते पालखीपर्यंत पादुका डोक्यावर आणण्यात आल्या. कुशावर्तावरून पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा, हा अभंग झाल्यावर पालखीने प्रस्थान केले. पालखी दिमाखात पुढे निघाल्यानंतर महामृत्युंजय भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत पालखी आली आणि निवृत्तिनाथांना त्र्यंबकेश्वराचे दर्शन घडवून तुम्ही विश्वनाथ दीन रंजक मी अनाथ कृपा कराल थोडी... हा अभंग होऊन पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. रथाला येथील माजी नगराध्यक्ष सुनील महाराज अडसरे यांच्या खिल्लारी बैलांना मान मिळाला होता, तर त्र्यंबकच्या वेशीपासून ते नाशिकपर्यंत ब्राह्मणवाडे (त्र्यंबक) येथील गोऱ्हे परिवाराचे बैल आलटून-पालटून पंढरपूरपर्यंत जाणार आहेत.