‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

By Admin | Updated: August 8, 2014 01:40 IST2014-08-08T00:35:03+5:302014-08-08T01:40:10+5:30

‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

'Saheb' will give a date after the tenth? | ‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

’रेडगाव खुर्द : राजस्व अभियानांतर्गत काजीसांगवी येथील महसूल अदालतीत प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न मांडल्यानंतर तहसीलदारांनी नेहमीच्या सरकारी खाक्याप्रमाणे पाहायला येऊ, असे शासकीय उत्तर दिले. शेतकऱ्याने कधी येणार? असा प्रती प्रश्न करताच तहसीलदारांनी तारीख मिळाल्यानंतर बघू, असे सांगताच हेलपाटे मारून थकलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या तोंडून ‘साहेब..दहावे झाल्यावर तारीख देणार का’? असा गलितगात्र सवाल केल्याने लालफितीचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
महसूलच्या विविध योजनांची माहिती व समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, पुरवठा अधिकारी डोळसे, आमदार शिरीष कोतवाल यांच्या उपस्थितीत महसूल अदालत आयोजित केली होती. पुणेगाव कालवा गेल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. याबाबत सहा-सात वर्षांपासून तहसीलदारांकडे अर्ज फाटे केले. मागील अदालतीतही प्रश्न मांडला; परंतु अद्याप दखल घेतली नाही. हाच प्रश्न आजच्या अदालतीत सदर शेतकरी देवराम पर्बत ठाकरे यांनी मांडला असता तहसीलदार मनोज देशमुख यांनी शासकीय उत्तर देताच अर्ज फाटे अन् हेलपाटे मारून हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या तोंडून साहेब..(माझे) दहावे झाल्यावर तारीख देणार का? असा सवाल झाला. वृद्धाचा गलितगात्र सवाल महसूल विभागाच्या कामकाजाचे अनुमान करण्यास पुरेसा आहे.
प्रारंभी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, परित्यक्ता महिलाच्या योजना, कुटुंब अर्थ सहाय्य योजना, आम आदमी बिमा योजनाच्या पात्रतेच्या अट, देण्यात येणारे लाभ व शेतकरी हिताच्या शासन निर्णयांची माहिती देण्यात आली. पुणेगाव कालव्यात गेलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला मिळाला नाही. याबाबत आलेल्या निवेदनावर कोतवालानी खुलासा केला. जीर्ण शिधापत्रिका बदलून मिळाव्या, पाच वर्ष उलटूनही लाभ मिळत नाही अशा सर्वाधिक तक्रारी पुरवठा विभागाच्या आल्या. गारपीटग्रस्त अनुदानातील गोंधळ अशाही तक्रारी आल्या. त्या निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी १५ शिधापत्रिका देण्यात आल्या. परंतु नवीन, दुय्यम, विभक्त शिधापत्रिकांचे अर्ज वाटप व स्वीकृती केल्याने एकच गोंधळ उडाला. बाळकृष्ण ठाकरे, सरपंच रंजना पगारे, उपसरपंच सुनील ठाकरे, एन. पी. शिंदे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Saheb' will give a date after the tenth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.