सहकाराला सुसंस्काराची गरज : देवेंद्र फडणवीस
By Admin | Updated: January 18, 2016 23:30 IST2016-01-18T23:30:00+5:302016-01-18T23:30:36+5:30
वसाकाच्या गाळप हंगामाचे उद््घाटन

सहकाराला सुसंस्काराची गरज : देवेंद्र फडणवीस
नाशिक : गेल्या काही वर्षांच्या कार्यकाळात सहकाराला स्वाहाकाराचे स्वरूप आले होते. मात्र आजच्या परिस्थितीत सहकाराला संस्कारित भावनेने चालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार सीमा हिरे,आमदार जे. पी. गावित, आमदार अनिल कदम, आमदार अपूर्व हिरे, आमदार दीपिका चव्हाण, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, राज्य शिखर बॅँकेचे प्रशासक एम. एल. सुखदेवे, केदा अहेर, किशोर दराडे आदि उपस्थित होते. (पान ४ वर)
फडणवीस पुढे म्हणाले की, वसाका कारखाना कोमात गेलेल्या रुग्णांसारखा होता. तो चालू करणे अत्यंत जिकरीचे असूनही राहुल अहेर यांनी पाठपुरावा करून तो सुरू करण्यासाठी आपल्याकडे पाठपुरावा केला. मात्र आता कारखाना सुरू झाला आहे. तो असाच सुरू ठेवला तर राज्यातील नव्हे तर देशातील ते एकमेव उदाहरण ठरेल. जो कारखाना अवसायानात जाऊनही पुन्हा तीन वर्षांत सहकारी तत्त्वावर सुरू झाला. आज सहकार क्षेत्र उद््ध्वस्त झाले आहे. सहकाराचा स्वाहाकार केला गेला आहे. खासगी स्पर्धेत सहकाराला टिकविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदतीच्या भूमिकेत आहे. सहकाराला आज संस्कारित भावनेने चालविण्याची गरज निर्माण झाली आहे. मी उद्घाटनासाठी आलो आहे, आता पुढच्या दोन वर्षांनी पुन्हा उसाची मोळी टाकण्यासाठी येईल. आता कारखाना सुरू झाला आहे. आता कामगारांनीही एकेक पैसा वाचवून कारखान्याच्या उज्ज्वल भविष्याचे साक्षीदार झाले पाहिजे. जितक्या कष्टाने कारखाना सुरू केला आहे. तितक्याच मेहनतीने तो सुरू राहिला पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शेतीसाठी आता ठिबक सिंचनाची गरज : गिरीश महाजन
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. आताच मला पाण्यावरून अनेक कठीण प्रसंगातून जावे लागत आहे. जेवढे रावणाचे पुतळे जाळले नसतील, तेवढे माझे पुतळे पाण्यावरून जाळले गेले आहेत, परंतु मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्यांच्या भावना मला समजू शकतात. मात्र आता शेतकऱ्यांनीही सूक्ष्मसिंचन शेतीकडे वळले पाहिजे. जळगावमध्ये ठिबकसिंचनातून केळीच्या बागा आणि मक्याची शेती फुलली आहे. नााशिककरांनीही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मागील मंजूर असलेल्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत. चणकापूर वाढीव कालव्यासाठी ७५ ते ८० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुंबईकरांच्या पाण्याची सोय करण्यासाठी कोयना धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प विचाराधीन असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
तत्पूर्वी प्रास्ताविकात आमदार डॉ. राहुल अहेर म्हणाले, आपल्या राजकीय जीवनातील हा प्रसंग कायम स्मरणात राहील. कारखाना सुरू करण्यासाठी आपण सातत्याने जिल्हा बॅँक व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. वसाका हा कसमादेचा कोहीनूर आहे. अवसायानात गेलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी कामगार व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. सरकारचे धोरण चांगले असल्यानेच कारखाना सुरू होऊ शकला. केदा अहेर यांनी सांगितले, शेतकरी हिताचा निर्णय घेणारे हे सरकार व मुख्यमंत्री आहेत. आता कसमादेच्या सिंचन योजनांसाठीही आवश्यक त्या निधीची तरतूद सरकारने करून द्यावी. मांजरपाडा, नारपार या योजना बंद करू नये. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, वसाका सुरू करण्यासाठी सरकारने सर्वेतोपरी सहकार्य केले. त्याच धर्तीवर आता निफाड व नाशिक सहकारी साखर कारखानाही सुरू करण्यास मदत करावी. भविष्यातील पाणीप्रश्न चिघळणार असल्याने मुंबईसाठी समुद्रातील खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प हाती घ्यावा, आपण त्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा केला आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, मांजरपाडा खरे तर तापी खोऱ्यासाठीचा प्रकल्प होता. तो गोदावरीकडे वळविण्यात आला. आता मांजरपाडा दोेन, नारपार या सिंचनाच्या योजना तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. कसमादेसाठी पाणीप्रश्न गंभीर होत आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, जिल्हा बॅँक संचालक अद्वय हिरे, माणिकराव कोकाटे, जि. प. सभापती उषा बच्छाव, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार,अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, जि.प. सदस्य डॉ. भारती पवार, रवींद्र देवरे, नितीन पवार, संजय चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, बी. डी. देसले, शैलेश सूर्यवंशी, संजय सोनवणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इन्फो..
पहिले वर्ष शोधमोहिमेचे
सिंचनमंत्री महाजन यांनी त्यांचे पहिले वर्ष गैरव्यवहार शोधण्यातच घालविले. त्यामुळे त्यांना सिंचनमंत्री की गैरव्यवहार शोधणारे मंत्री म्हणावे, असा आपल्याला प्रश्न पडल्याचे फडणवीस यांनी सांगताच सर्वत्र हशा पिकला. पहिले वर्ष सर्व गोष्टी ठीक करण्याचे होते. मात्र आता शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाहीत. सर्व जलसिंचन योजना पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.