साधूंनी राजकारणात पडू नये
By Admin | Updated: August 10, 2015 23:40 IST2015-08-10T23:39:00+5:302015-08-10T23:40:52+5:30
महाजन यांचा नरेंद्रगिरींना टोला

साधूंनी राजकारणात पडू नये
साधूंनी राजकारणात पडू नयेमहाजन यांचा नरेंद्रगिरींना टोलानाशिक : माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी गौरवोद्गार काढणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील नरेंद्रगिरी महाराज यांचे विधान विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच झोंबले आहे. नाशिक येथील पाहणी दौऱ्यात महाजन यांनी, साधू-महंतांनी राजकारणात हस्तक्षेप करू नये, तो त्यांचा विषय नसल्याचे विधान करून नरेंद्रगिरी महाराज यांना टोला लगावला.
रविवारी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकसह कावनई आणि त्र्यंबकेश्वर येथे जाऊन तेथील कामांची माहिती घेतली. त्या पार्श्वभूमीवर लागलीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक गाठून साधुग्रामची पाहणी केली. यावेळी त्यांनी नरेंद्रगिरी महाराज यांचा नामोल्लेख न करता साधू-महंतांनी राजकारणापासून वेगळे राहावे, असा सल्ला देऊन टाकला. काही समस्या असतील तर त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.
महंत नरेंद्रगिरी यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कामकाजाविषयी कौतुक केले होते. ते न रुचल्याने सोमवारी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री महाजन यांनी नरेंद्रगिरी यांना राजकीय विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला. सेवा, सुविधेच्या बाबतीत प्रशासनाला सूचना कराव्यात, ज्या शक्य असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, महंत नरेंद्रगिरी यांनी चार दिवसांपूर्वी प्रशासन चांगले काम करीत असल्याचे म्हटले होते. याची आठवण करून देत नरेंद्रगिरी महाराजांनी आपल्या विधानाशी ठाम राहावे, असा सल्लाही यावेळी त्यांना दिला. (प्रतिनिधी)