सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्या साधू-महंतांची मागणी; महापालिकेत प्रशासनाबरोबर पहिलीच बैठक
By सुयोग जोशी | Updated: March 24, 2025 20:20 IST2025-03-24T20:19:43+5:302025-03-24T20:20:16+5:30
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते.

सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्या साधू-महंतांची मागणी; महापालिकेत प्रशासनाबरोबर पहिलीच बैठक
नाशिक (सुयोग जोशी) : राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्यावे तसेच साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी साधू महंतांनी प्रशासनाबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत केली.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते. आखाड्यांच्या वतीने महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज, अनिकेत शास्त्री यांच्यासह ७० पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते.
यावेळी साधू महंतांनी आखाड्यांना योग्य जागा मिळावी, सर्व आखाडे, खालसे प्रमुख आणि सार्वजनिक संस्थांना या पूर्वीचा गर्दीचा अभ्यास करून नियमानुसार जागा उपलब्ध करून द्याव्यात, गोदावरी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करणे, जेणेकरून भाविकांना शुद्ध तीर्थ मिळू शकेल, शहरातील सर्व मंदिर परिसर व कुंभमेळाच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा अनुभव घेऊन, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये योग्य नियोजन करावे, "शाही स्नान"ऐवजी "अमृत स्नान" या शब्दप्रयोगाचा वापर करावा, ज्यामुळे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व जगभर पसरेल अशा मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधूंच्या मागण्यांना प्राधान्य देऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.