साधुग्राममध्ये जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग
By Admin | Updated: September 14, 2015 23:21 IST2015-09-14T23:19:54+5:302015-09-14T23:21:19+5:30
साधुग्राममध्ये जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग

साधुग्राममध्ये जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीनंतर साधूंसह राज्य- परराज्यातील भाविकांनी तिसऱ्या पर्वणीची आस धरून साधुग्राममध्येच मुक्काम वाढविल्याने वाढत्या गर्दीमुळे भंडाऱ्यांत जेवणावळीसाठी रांगा लागल्या असून, पत्रावळींचे मोठे ढीग रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी वाढली असून, साथीच्या आजारात वाढ झाली आहे.
दरम्यान, ठिकठिकाणी ठेवलेले कचऱ्याचे डबे भरलेले असून, त्याबाहेर सांडलेल्या कचऱ्यावर भटकी कुत्री फिरत आहेत. रविवारी दुसऱ्या पर्वणीला भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस, प्रशासन तसेच आरोग्य व स्वच्छ यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. तरीही सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने कार्य करीत साधू व भाविकांच्या सेवेसाठी प्रयत्न केले. दुसऱ्या पर्वणीनंतर भाविक आपापल्या गावी निघून जातील, असा काही जणांनी अंदाज व्यक्त केला होता, परंतु तिसरी शाही पर्वणी तीन-चार दिवसांवर येऊन ठेपल्याने भाविकांनी नाशिक शहरासह पंचवटी विशेषत: तपोवन साधुग्राम परिसरात आसऱ्यासाठी ठिय्या मांडल्याने सर्वच यंत्रणेवरील ताण कायम आहे.