साधुग्राममध्ये शुकशुकाट

By Admin | Updated: September 22, 2015 00:04 IST2015-09-22T00:02:35+5:302015-09-22T00:04:10+5:30

परतीची लगभग : मंडप उतरविण्याचे काम पूर्णत्वाकडे

Sadhugram Shukashukat | साधुग्राममध्ये शुकशुकाट

साधुग्राममध्ये शुकशुकाट

नाशिक : साधुग्राममध्ये निम्म्यापेक्षा जास्त खालसे रविवारी रिकामे झाल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे. साधुग्राममधील रस्त्यांवरील गर्दीही ओसरली आहे. खालसे रिकामे झाल्यानंतर त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
सेक्टर दोनमधील सर्वाधिक खालशांनी पावसाच्या संततधारेमुळे बस्तान गुंडाळले आहे. रामसृष्टी परिसरात बहुतांश खालशांनी आवरसावर करीत सामान रवाना केले. सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे मंडपासह इतर सामान आवरण्यासाठी धावपळ दिवसभर धावपळ करावी लागली. मात्र रिपरिप पावसात खालशातील साधूंच्या भक्तांनी मेहनत घेऊन वाहनामध्ये साहित्य टाकून रवाना केले. त्यामुळे बहुतांश खालशाचे निम्मे साहित्य रवाना झाले. येत्या दोन दिवसांत साधुग्राममध्ये मोजकेच खालसे दिसून येणार आहेत. विविध खालशांचे महंत शाही पर्वणीनंतर आश्रमात रवाना झाले आहेत.
उज्जैनला होणाऱ्या कुंभमेळ्याचे साधू-महंतांना वेध लागल्याने बस्तान गुंडाळण्यासाठी सर्वच खालशांची दमछाक झाली. त्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. पावसाने दोन-तीन दिवस विश्रांती घेण्याची गरज असल्याचे या कामगारांनी सांगितले. खालशांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने चिखल होऊन अवजड वस्तू उचलण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Sadhugram Shukashukat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.