वादळवाराच ठरविणार साधुग्रामचा दर्जा?
By Admin | Updated: June 18, 2015 00:07 IST2015-06-17T23:57:56+5:302015-06-18T00:07:04+5:30
त्र्यंबकेश्वर : साधुग्रामचे काम रामभरोसे सुरू; पावसाळा असूनही प्रशासन मात्र निश्चिंत

वादळवाराच ठरविणार साधुग्रामचा दर्जा?
नाशिक : येथील साधुग्रामच्या कामांचा दर्जा कोणतीही यंत्रणा अथवा समिती ठरविणार नाही, तर पाऊस आणि वादळवाऱ्यात होणाऱ्या नुकसानीनंतर येथील कामाच्या दर्जाविषयी बोलता येईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पावसामुळे नाशिकच्या साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामची कामे नाशिकप्रमाणेच सुरू आहे. विशेष म्हणजे येथील साधू-महंतांकडूनही कोणतीच हरकत घेण्यात आली नसून, दर्जाबाबत त्यांनीही मौन बाळगल्याने ऐन पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ उडण्याची शक्यता आहे.
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे नाशिकमधील साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामाबाबत जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे समजते. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे येथील साधुग्राममध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयांचे पत्रे उडून गेले होते. अनेक शेड्स कोलमडून पडले होते तर ठिकठिकाणचा मुरूम वाहून गेल्याने पाण्याचे डबके साचले होते. या पावसातच केलेल्या कामांचा दर्जा उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.
वास्तविक नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरला पावसाची कृपा जास्त असते. पावसाळ्यात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असतात. डोगर कड्यांनी व्यापलेल्या त्र्यंबकेश्वरला पावसाबरोबरच वाराही वाहत असतो. अशा वातावरणात येथील साधुग्रामची कामे मजबूत होणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने कामे केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नाशिकच्या कामांबाबतही असेच बोलले जात होते. परंतु एकाच पावसात कामांचा दर्जा उघड झाला होता. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामांच्या दर्जाबाबत अधिक काम करता येणे शक्य असताना प्रशासनाकडून मात्र फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसते. पाऊस आणि वाऱ्यात साधुग्राम आणि तंबूंची काय अवस्था होते, यावरून येथील कामांचे मूल्यमापन ठरविण्याचा अजब फंडा प्रशासनाचा आहे.