साधुग्राम स्वच्छता ठेका, २४ला सुनावणी
By Admin | Updated: August 18, 2015 00:14 IST2015-08-18T00:13:25+5:302015-08-18T00:14:11+5:30
साधुग्राम स्वच्छता ठेका, २४ला सुनावणी

साधुग्राम स्वच्छता ठेका, २४ला सुनावणी
नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात महापालिकेकडून प्रतिज्ञापत्र सादर न झाल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी येत्या २४ आॅगस्टला ठेवली आहे. दरम्यान, सुनावणीच्या दिवसांपर्यंत महापालिकेकडून प्रतिज्ञापत्राबाबत घोळ सुरूच असल्याने प्रशासनाकडून एकूणच वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला न देता द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस कंपनीने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, न्यायालयाने सोमवारी महापालिकेला आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, स्थायी समितीच्या सूचनेवरून महापालिकेने या दाव्यासाठी नवीन वकील विवेक साळुंके यांची नेमणूक केली. गेल्या शनिवारी आरोग्याधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राचा नमुना तयार करून तो वकिलाकडे रवाना केला; परंतु सोमवारी सुनावणीच्या वेळेपर्यंत प्रतिज्ञापत्राबाबत अंतिम निर्णय न होऊ शकल्याने महापालिकेला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी महापालिकेला २४ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
महापालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात साधुग्राम स्वच्छतेची पर्याय व्यवस्था करण्यात आली असून, उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो अंमलात आणला जाईल, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)