जुलैअखेरपर्यंत साकारणार साधुग्राम
By Admin | Updated: November 23, 2014 23:41 IST2014-11-23T23:41:35+5:302014-11-23T23:41:37+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : अंतर्गत रस्ते, ड्रेनेजची कामे युद्धपातळीवर सुरू

जुलैअखेरपर्यंत साकारणार साधुग्राम
पंचवटी : आठ महिन्यांवर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने तपोवनातील साधुग्रामच्या ५४ एकर जागेवर अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन टाकणे, सर्व्हिस रस्ते तयार करणे तसेच साधू-महंतांच्या आखाड्यांसाठी लागणाऱ्या जागा आखणीचे काम सुरू केले आहे. आॅगस्ट महिन्यात पहिले शाहीस्नान असून, त्या पार्श्वभूमीवर जुलैअखेरपर्यंत साधुग्रामचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जवळपास सव्वातीनशे एकर जागेची गरज असून, त्यापैकी सध्या केवळ ५४ एकर जागा ताब्यात आहे. ताब्यात असलेल्या या जागेवर प्रशासनाने साधुग्रामचे काम सुरू केले असून, जसजसा जागेचा ताबा मिळेल त्यानुसार साधुग्रामचे कामे करणार असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. देशभरातील साधुमहंत या सिंहस्थासाठी नाशिकला येणार असल्याने त्यादृष्टीने तपोवनातील जागा ताब्यात घेण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. (वार्ताहर)