नाशिक : कडक लॉकडाउन जाहीर झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे अनेकांना कमावर जाता येणार नसल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यानिमित्ताने अनेकांना मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनची आठवण झाली.
भाजीपाला दरावर परिणाम
नाशिक : भाजीपाला विक्रेत्यांवर आलेल्या निर्बंधामुळे भाजीपाल्याच्या दरावर त्याचा परिणाम झाला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने विक्रते जेवढा माल विक्री होईल तेवढीच खरेदी करत असल्याने दर कोसळले आहेत. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे
ग्रामीण भागात रुग्ण वाढले
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढल्याने अनेक ठिकाणी बेड मिळणे मुश्कील झाले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
नवीन व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. ज्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केले आहेत ते व्यावसायिक तर पूर्णपणे अडचणीत आले आहेत. एक रुपयाची कमाई नसताना त्यांना घरातून जागा भाडे द्यावे लागत आहे. व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच तो बंद करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : दशक्रिया विधीसाठी उपस्थितीवर निर्बंध घालण्यान आले असले तरी गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने या ठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. अनेक नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
रामसृष्टी उद्यान परिसरातही होते पूजा
नाशिक : दशक्रिया विधीसाठी गंगेवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता रामसृष्टी उद्यान परिसरातही पूजा होऊ लागली आहे. त्यामुळे गंगेवर होणारी गर्दी कमी होण्यास काही प्रमाणात हातभार लागला आहे. विधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही ते सोयीचे ठरत आहे.
हापूस आंब्यांची मागणी वाढली
नाशिक : अक्षयतृतीयेनिमित्त हापूस आंब्यांना मागणी वाढली आहे. अक्षयतृतीयेला आंब्याचे विशेष महत्त्व असल्याने बहुसंख्य नागरिक थोडेफार तरी आंबे खरेदी करत असतात त्यामुळे आंब्यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहे. कोरोनाचे सावट असल्याने गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत.
पावसाळी गटारींची कामे करण्याची मागणी
नाशिक : पावसाळा तोंडावर आला असला तरी मनपाच्यावतीने अद्याप पावसासाठी गटारींची स्वच्छता करण्याचे काम सुरू झालेले नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळी गटारीची लवकरात लवकर स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.