ग्रामीण बससेवा विस्कळीत
By Admin | Updated: February 1, 2017 01:46 IST2017-02-01T01:45:57+5:302017-02-01T01:46:09+5:30
ग्रामीण बससेवा विस्कळीत

ग्रामीण बससेवा विस्कळीत
नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाच्या करवाढीविरोधात माल वाहतूकदार व प्रवासी वाहतूकदार तर आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचाया वतीने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाचा बससेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही. शहर बससेवा सकाळपासून सुरळीत असल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासनाने केला आहे.
चक्का जाम आंदोलनामुळे शहर बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सकाळी अकरा वाजता द्वारका, महामार्गावरील अमृतधाम चौफुली, त्र्यंबक रस्त्यावरील बेजे फाटा तसेच निफाडजवळील चांदोरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलनासाठी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्यामुळे नाशिकहून वरील मार्गावर साडेअकरा वाजेनंतर सुटणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड, सायखेडा, ओझरकडे जाणारी बस वाहतूक विस्कळीत झाली होती. अन्य मार्गावरील शहर बस वाहतूक दिवसभर सुरळीत असल्याचा दावा विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केला आहे.
शहर व ग्रामीण बससेवा आंदोलनामुळे खूप प्रभावित झाली नाही. सर्व फेऱ्या नियमित सुरू होत्या, असे जरी प्रशासनाच्या वतीने जोशी यांनी सांगितले असले तरी शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांना बसेसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे रहावे लागल्याचे चित्र होते, तर आगारही बसेसच्या पार्किंगमुळे हाऊसफुल झाले होते. अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील काही मार्गांवरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.