ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ
By Admin | Updated: April 1, 2017 21:15 IST2017-04-01T21:15:01+5:302017-04-01T21:15:01+5:30
डिजिटाइझेशन करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अखेरच्या चौथ्या टप्प्याची मुदत ३१ मार्चअखेर संपुष्टात

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ
नाशिक : उपग्रहाद्वारे प्रक्षेपित होणारे खासगी दूरचित्रवाहिन्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या यंत्रणेचे संपूर्ण डिजिटाइझेशन करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अखेरच्या चौथ्या टप्प्याची मुदत ३१ मार्चअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील १५१३४ केबलधारकांचे प्रक्षेपण खंडित करण्यात आल्याने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने सन २०१२ मध्ये केबल प्रक्षेपणाचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला, त्यामागे ग्राहकांना अधिकाधिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा त्याचबरोबर करमणूक कराची चोरी रोखता यावी हा हेतू असल्याने पहिल्या टप्प्यात देशातील ९२ महानगरांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली व सेटटॉप बॉक्स बसविल्याशिवाय कार्यक्रम दूरचित्रवाणीवर दिसू शकणार नाही, अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर मात्र टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात डिजिटायझेशन करण्यात आले. या योजनेचा अखेरचा टप्पा डिसेंबर २०१६ मध्येच संपुष्टात येणार होता. तथापि, शासनाने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बदलून देण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. त्यानुसार ३१ मार्च अखेरची मुदत होती. चौथ्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती वगळता ग्रामपंचायत पातळीवरील गावांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याचा समावेश होता. शासनाने वेळोवेळी आवाहन करूनही जिल्ह्यातील १५१३४ नागरिकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्याने शुक्रवारी रात्री बारा वाजेनंतर त्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने डेन, हाथवे, इंड्स या तीन प्रमुख कंपन्यांच्या एमएसओंना पत्र देऊन प्रक्षेपण बंद करण्याबाबत तीन दिवसांत अहवालही मागविला आहे.