प्रशासनाची धावपळ : ग्रामपंचायतीची विहीर उपसली
By Admin | Updated: April 2, 2015 00:25 IST2015-04-02T00:24:51+5:302015-04-02T00:25:19+5:30
भालूरला विषारी पाणीपुरवठ्याची अफवा

प्रशासनाची धावपळ : ग्रामपंचायतीची विहीर उपसली
मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत थायमेट हे विषारी औषध टाकले असल्याची अफवा मंगळवारी गावात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तत्काळ पाण्याच्या प्राथमिक तपासाअंती असा प्रकार नसल्याचा अंदाज व्यक्त केला, तर खबरदारीचा उपाय म्हणून या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून टाकण्यात आले आहे. संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या या घटनेच्या अफवेचा जन्मदाता कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गावाच्या पश्चिम शिवारात असलेल्या बंंधाऱ्याखालील ग्रामपंचायतच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. या विहिरीजवळ काही महिलांचे भांडण झाल्याने रागाच्या भरात विहिरीत थायमेट हे विषारी द्रव्य टाकले असल्याची चर्चा गावात पोहचली. मंगळवारी (दि. ३१) पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर सर्वत्र पसरलेल्या या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. बुधवारी (दि. १) ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी गावात फिरून घरोघरी सोडलेले पाणी पिण्यासाठी वापरू नका, अशा सूचना केल्या.
याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले. सरपंच वामन पवार, आरोग्यसेवक आर. के. कराड व ग्रामस्थांनी विहिरीवर जाऊन पाहणी केली. प्राथमिक तपासाअंती पाण्यात विषबाधा नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. असे असले तरी खबरदारीची उपाय योजना म्हणून विहिरीतील संपूर्ण पाणीसाठा उपसून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार दिवसभर विद्युतपंपाच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसून विहीर कोरडी करण्यात येऊन परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई निर्माण झालेली असताना घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करावा लागला. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत चौकशी करून अफवा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाही, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)